16 आमदार बाद झाल्यावरही शिंदेच मुख्यमंत्री, काय आहे गणित?; जे भाजपने सांगायचं ते अजितदादा यांनीच सांगितलं

| Updated on: Apr 16, 2023 | 4:28 PM

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार स्थिर असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. 16 आमदार बाद झाल्यानंतरही हे सरकार कसं स्थिर राहील याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

16 आमदार बाद झाल्यावरही शिंदेच मुख्यमंत्री, काय आहे गणित?; जे भाजपने सांगायचं ते अजितदादा यांनीच सांगितलं
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर : राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजून लागल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस यांचं सरकार कोसळणार असल्याचं सांगितलं जात आहे. 16 आमदार अपात्र झाल्यावर शिंदे यांना पायउतार व्हावं लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. असं असलं तरी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मात्र सरकार जाणार नसल्याचं वाटतं. 16 आमदार बाद झाले तरी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. सरकार जाणार नाही, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. त्यासाठी अजित पवार यांनी हे सरकार कसं टिकेल याचं गणितच समजावून सांगितलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 16 आमदार डिस्क्वॉईलड होतील असं सांगितलं जातं. आता अपक्ष धरून भाजपकडे 115 आमदार आहेत. त्यात 106 भाजपचे आमदार आहेत. तर 6 अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे. असे मिळून 115 आमदार भाजपकडे आहेत. तर एकनाथ शिंदेंकडे 40 आमदार आहेत. शिंदे यांच्यासोबतचे 10 अपक्ष बाजूला ठेवा. कारण अपक्ष सत्ता असते तिकडे जातात. तूर्तास त्यांना गृहित धरू नका. शिंदे यांच्याकडे केवळ 40 आमदार आहेत असं समजा.

हे सुद्धा वाचा

शिंदे यांचे 40 आमदार आणि भाजपचे 115 आमदार मिळून आमदारांची संख्या 150 होते. शिवाय आठ दहा लोकं म्हणजे बच्चू कडू, रवी राणा आणि इतर असे 10 अपक्ष आमदार युतीसोबत येतील. म्हणजे115, 10 आणि 40 आमदारांची गोळाबेरीज केल्यास ही संख्या 165 होतात. त्यातील 16 आमदार अपात्र होऊन कमी झाले. तर युतीकडे 149 आमदार उरतात. बहुमताचा जो आकडा आहे, म्हणजे मॅजिक फिगर 145 आहे. मग कारण नसताना वावड्या उठवण्याचं काम का सुरू आहे? असा सवाल अजित पवार यांनी केला.

वस्तुस्थिती पाहा

माझ्या ज्ञानाप्रमाणे युतीकडील आमदारांची संख्या 149 राहते. विधानसभेतील आमदारांची संख्या 288 आहे. या 288मधील 16 आमदार गेल्यावर विधानसभेची सदस्य संख्या 272 होते. 272 सदस्यसंख्या झाल्यावर बहुमताचा आकडाही कमी होतो. तो किती राहतो तो पाहा. त्यामुळे तुम्हाला गणित समजेल. ही वस्तुस्थिती आहे. आपण वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. कारण नसताना चित्र रंगवण्यात गरज नाही. कुणााबद्दल शंका निर्माण करू नका, असंही अजित पवार म्हणाले.

आघाडीच्या सहा ते सात सभा

महाविकास आघाडीच्या राज्यात सहा ते सात सभा होणार आहे. येत्या 1 मे रोजी मुंबईत सभा होणार आहे. तर 11 जूनला अमरावतीमध्ये सबा होणार आहे. प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांना भाषण करण्याची संधी द्यायची हे सूत्र आघाडीचं ठरलं आहे. त्यामुळे आमच्या पक्षाच्यावतीने स्थानिक नेते म्हणून आज नागपुरात अनिल देशमुख बोलतील. तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील बोलतील. काँग्रेसकडून नाना पटोले आणि केदार भाषण करतील. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे हे भाषण करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.