मोठी बातमी ! ठाकरे गटाचे इतर खासदारही फुटणार, शिंदे गटासोबत झाली गुप्त बैठक; खासदार कृपाल तुमाने यांचा गौप्यस्फोट

| Updated on: May 25, 2023 | 11:32 AM

शिंदे गटाचे नेते, खासदार कृपाल तुमाने यांनी एक मोठा दावा केला आहे. ठाकरे गटाचे खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत चर्चाही झाली आहे, असा दावा तुमाने यांनी केला आहे.

मोठी बातमी ! ठाकरे गटाचे इतर खासदारही फुटणार, शिंदे गटासोबत झाली गुप्त बैठक; खासदार कृपाल तुमाने यांचा गौप्यस्फोट
krupal tumane
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर : शिंदे गटाचे 13 खासदार निवडून येणार नाहीत, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, राऊत यांचा हा दावा शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाणे यांनी फेटाळून लावला आहे. आमच्या गटाचे सर्वच्या सर्व 13 खासदार विजयी होतील, असा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे. तसेच ठाकरे गटाचे उरलेले खासदारही शिंदे गटात येणार आहेत. या खासदारांसोबत आमची बैठक झाल्याचा गौप्यस्फोट तुमाने यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात असून तुमाने यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे.

खासदार कृपाल तुमाने यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. ठाकरे गटाकडे असलेले खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काल मुंबईत ठाकरे गटाच्या त्या खासदारांसोबत आमची बैठक झाली, ते शिंदे गटात यायला तयार आहेत. लवकरच त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश केला जाणार असल्याचा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

आमदारही फुटणार

ठाकरे गटाचे काही आमदारंही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. काल शिवससेनेची बैठक झाली. त्यानंतर खासदार कृपाल तुमाने यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना खासदारांची बैठक झाली. त्या बैठकीत निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आम्ही 13 खासदार ज्या मतदारसंघातून निवडून आलो, तेच मतदारसंघ आम्ही लढवणार आहोत. ऊर्वरीत लोकसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं. तसेच संजय राऊत इतर पक्षाचे दलाल आहेत. त्यांनी पक्षाचा सत्यानाश केला. तरी उद्धवजी काही बोलत नाहीत, असा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला.

ते खासदार कोण?

ठाकरे गटाच्या खासदारासोबत आमची काल बैठक झाल्याचा दावा तुमाने यांनी केला आहे. हे खासदार आमच्यासोबत येण्यास तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शिंदे गटासोबत बैठक करणारे ठाकरे गटाचे ते खासदार कोण? असा सवाल करण्यात येत आहे. हे खासदार मुंबईतील आहेत की मुंबई बाहेरचे असा सवालही केला जात आहे. शिंदे गटासोबत खरंच हे खासदार बैठकीला उपस्थित होते का? की शिंदे गटाकडून पुडी सोडली जात आहे, असाही प्रश्न केला जात आहे.