ओबीसी आंदोलनात फूट? लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला बबनराव तायवाडे यांचा पाठिंबा? मोठी अपडेट समोर
Laxman Hake-Babanrao Taywade-OBC : ओबीसी नेत्यांच्या वेगवेगळ्या चुली दिसून येत आहे. प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मुंबईकडे ओबीसी मोर्चा वळवला आहे. आज ते मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. त्याचवेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते डॉ. बबनराव तायवाडे यांनी त्यावर मोठे वक्तव्य केले आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांनी गनिमी काव्याने मराठ्यांनी मुंबईत पोहचण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे प्राध्यापक लक्ष्मण हाके हे ओबीसी मोर्चा घेऊन थोड्याचवेळात मुंबईकडे निघणार आहे. त्यांना अगोदरच पोलिसांनी मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली आहे. ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचा दाव करत हाके हे मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत आहे. पण त्याचवेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे ओबीसी चळवळीत फूट पडली का? असा सवाल विचारल्या जात आहे.
लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलनावर ठाम
मी माझ्या आंदोलनावर ठाम असून ओबीसी आंदोलकांसह मी आज मुंबईकडे रवाना होणार आहे. पोलिसांनी त्यांचं काम करावं मला अडवलं तर मी रस्त्यात बसणार आहे. मुख्यमंत्र्यांची आई माई काढली तेव्हाच दखल घेतली जाणार का? ओबीसींचा फक्त मतांसाठी वापर केला जातोय. शंभूराज देसाई नालायक माणूस आहे, त्याला ओबीसींचे काही देणे घेणे नाही. ओबीसींचे आमदार नेते हे पक्षाचे गुलाम झाले आहेत. मनोज जरांगे पाटील ओबीसीचे आरक्षण संपवू पाहतोय. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार असे निर्धार प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला.
22 लाख 20 हजार 577 कुणबी प्रमाणपत्र वाटल्याचं बोललं जात आहे. बावनकुळे यांचा सत्कार काय किंवा मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार काय हे आता चालू राहणार आहे. मुळात जरांगेची काय भावना आहे हे दोन चार दिवसात बघायला भेटलं आहे. पण मराठा समाजाची ही लढाई जरी संपली असली तरी ओबीसी ची लढाई आता एक सप्टेंबर पासून महाराष्ट्रामध्ये बघायला भेटेल. कारण मराठा समाज ओबीसी मध्ये आल्यानंतर ओबीसी हा क्लास तुम्हाला दिसणार नाही. ओबीसी आता संपलाय. त्यामध्ये फक्त आता मराठा आणि कुणबी येणार. ओबीसी बांधवांना आता ही निर्णय लढाई लढावी लागेल. ओबीसीचे अख्ख आरक्षण मराठा समाजाला देऊन टाकल्यासारखा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात देशाच्या इतिहासात कधी नव्हे ते ओबीसीच आरक्षण कोणी केलं असेल तर आताच्या सरकारने केलं आहे. मनोज जरांगे चे काय संस्कार आहेत ते महाराष्ट्राने बघितला आहे. त्यांचा चेहरा बघितल्यानंतर रात्रीच्या बातम्या चालू झाल्या तर महिला टीव्ही बंद करतात. जरांगे बोलल्यानंतर महिलांच्या मनात लज्जा निर्माण होते. अशा व्यक्तीला मराठा समाजाने नेतृत्व म्हणून स्वीकारला आहे हे दुर्दैव आहे. मराठा समाजाला माझं सांगणं आहे आता तुम्ही ओबीसीच्या दारात कुठल्या नैतिकतेने मत मागायला जाणार. १ सप्टेंबर पासून आम्ही मुंबईला जाऊ लाखोच्या संख्येने जनसमुदाय मुंबईमध्ये जमणार आहे. मनोज जरांगेच्या आंदोलनाचा आम्हाला घेण नाही. एक सप्टेंबरला ओबीसी म्हणजे काय हे आम्ही सरकारला दाखवू, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला.
हाके यांच्या मोर्चाला आमचा पाठिंबा नाही
लक्ष्मण हाके यांचा आजच्या ओबीसी मोर्चाच्या मागण्या स्पष्ट नाही. लक्ष्मण हाके यांच्या मोर्चाच्या मागण्या स्पष्ट नसल्याने आजच्या मोर्चात राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभागी नाही. आजच्या हाके यांच्या ओबीसी मोर्चाचा आमचा पाठिंबा नाही, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले.