
Nagpur Municipal Corporation: इतर पक्षांचे जागावाटपावरून तळ्यातमळ्यात सुरू आहे. कुणाला अधिक जागा हव्यात तर कुणाला युती आणि आघाडी नको आहे. स्वबळाचा नारा देतानाच एखादा पालिकेत युती, आघाडी होते का याकडेही राज्यातील प्रमुख पक्षांचं लक्ष आहे. पण आपने राज्यात उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. आम आदमी पार्टीने नागपूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उमेदवारांची नावं जाहीर करणारा आप हा पहिला पक्ष ठरला आहे. इतर पक्षांची चर्चेची गुऱ्हाळं सुरु असताना आपने उमेदवारी जाहीर करण्यात तरी आघाडी घेतल्याचे दिसून येते.
दहा उमेदवारांची नावं जाहीर
नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीच्या दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महापालिका निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत.तर दुसरीकडे आम आदमी पार्टीने उमेदवारही जाहीर केले आहेत. महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री भूषण ठाकूरकर आणि नागपूर शहराध्यक्ष अजिंक्य कळंबे यांच्यातर्फे आम आदमी पार्टीच्या दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणूक लोकांच्या मूलभूत मुद्द्यांवर लढवत असल्याचे आम आदमी पार्टी तर्फे सांगण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडी 24 डिसेंबरला उमेदवारांची घोषणा करणार
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 147 उमेदवारांची यादी येत्या 24 डिसेंम्बर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. या 147 लोकांच्या यादीत बौद्ध,आदिवासी, ओबीसी, मुस्लीम, जैन आणि उत्तर भारतीय दलितांना प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे.
वंचित बहुजन आघाडीने मुंबईत वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन सातत्याने आंदोलन केली आहेत. गेल्या 25 नोव्हेंबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ऐतिहासिक सभा घेण्यात आली होती, ज्याला जवळपास पावणे 3 लाख लोकांची उपस्थिती होती.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपली ताकद दाखवुन दिली आहे.
परभणीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा
यावेळी काँग्रेस परभणी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार आहे, असे बाबाजानी दुर्राणी यांनी जाहीर केले आहे. कुठल्याच पक्षासोबत काँग्रेस आघाडी किंवा युती न करता स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड होताच नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, त्यामुळे मला कमी वेळ मिळाला मात्र पाचही ठिकाणी काँग्रेस मजबूत स्थितीत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.