Nagpur | दोनशे पानांचा अहवाल, सतरा पानांमध्ये निष्कर्ष आणि चौदा बैठका; नागपूर मनपा घोटाळ्याच्या अहवालात नेमकं दडलंय काय?

| Updated on: Feb 18, 2022 | 3:26 PM

नागपूर महापालिकेच्या स्टेशनरी घोटाळ्याची ( Stationery Scam) जळेमुळे खूप खोल गेली आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमिततेची झाल्याची बाब समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे (Avinash Thackeray) यांनी स्पष्ट केली. दोनशे पानांचा अहवाल तयार करण्यात आलाय. सतरा निष्कर्ष काढण्यात आलेत.

Nagpur | दोनशे पानांचा अहवाल, सतरा पानांमध्ये निष्कर्ष आणि चौदा बैठका; नागपूर मनपा घोटाळ्याच्या अहवालात नेमकं दडलंय काय?
महापौर दयाशंकर तिवारी यांना अहवाल सादर करताना अविनाश ठाकरे व समितीचे इतर सदस्य.
Follow us on

नागपूर : महापालिकेत (Municipal Corporation) स्टेशनरी घोटाळा (Stationery Scam) उघडकीस आला. एकाच ठेकेदाराला स्टेशनरीचे कंत्राट दिले जात होते. एकाच कंत्राटदाराच्या पाच वेगवेगळ्या कंपन्या कुटुंबीयांच्या नावे होत्या. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर स्टेशनरीचे रेट पाहून सारे अवाक झालेत. मनपाच्या सभेत यावर गरमागरम चर्चा झाली. नंतर चौकशी समिती बसली. या चौकशी समितीच्या अध्यक्षांनी काल अहवाल तयार करून महापौरांना सोपविला. यावेळी चौकशी समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे (Avinash Thackeray) म्हणाले, प्रथमदर्शनी सदर अनियमितता कोटींमध्ये झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र अनियमिततेची सखोल चौकशी झाल्यास व्याप्ती आणखी वाढू शकते. सदर अहवाल जवळपास दोनशे पानांचा आहे. एकूण निष्कर्ष सतरा पानांचा आहे. अनियमिततेची चौकशी करण्यासाठी चौदा बैठका घेण्यात आल्या. यात संबंधित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

अनियमिततेतील प्राथमिक तत्थ अहवालात

अविनाश ठाकरे म्हणाले, अनियमिततेची व्याप्ती मोठी असल्यामुळे चौकशीसाठी वेळ सुद्धा जास्त पाहिजे होता. तरीसुद्धा चौकशी समितीने कमी वेळात सतत काम करून अनियमिततेतील प्राथमिक तथ्य अहवालात समाविष्ट केलेले आहे. निवृत्त न्यायाधीश एस. पी. मुळे यांच्या मार्गदर्शनामुळे सदर अहवाल लवकर तयार होऊ शकला. सभागृहाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे ठाकरे यांनी सांगितले. आर्थिक अनियमितेबाबत केलेल्या तपासणीचा प्राथमिक अहवाल चौकशी समितीने गुरुवारी बंद लखोट्यात महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे ठाकरे यांनी सुपूर्द केला. यावेळी चौकशी समितीचे अध्यक्ष सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, सदस्य विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, सदस्य संदीप जाधव, ॲड. संजय बालपांडे, सदस्या वैशाली नारनवरे, निवृत्त न्यायाधीश एस.पी. मुळे, उपायुक्त निर्भय जैन, निगम सचिव डॉ. रंजना लाडे आदी उपस्थित होते.

चार मार्चला संपणार मनपाचा कार्यकाळ

पत्रकारांशी चर्चा करताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, या चौकशीचा व्याप मोठा असल्याने यासाठी जास्त कालावधीची आवश्यकता आहे. मात्र चार मार्च रोजी मनपाचा कार्यकाळ संपत असल्यामुळे समितीने प्राथमिक अहवाल सादर केला. सदर अहवाल पुढील सभागृहाच्या पटलावर ठेऊन दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी सांगितले. मनपाच्या सभागृहात विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आणि माजी स्थायी समिती सभापती ज्येष्ठ नगरसेवक विजय (पिंटू) झलके यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती.

Nagpur | माझे मत माझे भविष्य एका मताचे सामर्थ्य, जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, काय आहे ही स्पर्धा?

नागपुरातील सातपुडा वनस्पती उद्यानात बटरफ्लाय पार्क; योगा केंद्राव्यतिरिक्त काय असणार सुविधा?

बिबट्याने घेतला 16 वर्षीय मुलाचा घास, चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापुरात रात्री नेमकं काय घडलं?