Vishwas Nangre Patil : आजच्या Gen-Z ला काही बोलणंही अवघड – विश्वास नांगरे पाटील यांचं वक्तव्य चर्चेत

पोलीस आयुक्त विश्वास नांगर पाटील यांनी आजच्या तरूण पिढीबद्दल, Gen Z बद्दल महत्वाचं वक्तव्य केलं आहे, सध्या त्यांच्या या विधानाचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे. असं काय म्हणाले विस्वास नांगरे पाटील ?

Vishwas Nangre Patil : आजच्या Gen-Z ला काही बोलणंही अवघड - विश्वास नांगरे पाटील यांचं वक्तव्य चर्चेत
आजच्या पिढीचा केमिकल लोचा- विश्वास नांगरे पाटील यांंचं वक्तव्य
| Updated on: Jul 28, 2026 | 10:13 AM

गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून दिल्लीतल जंतरमंतर येथे जे विद्यार्थी आंदोलन सुरू होतं, त्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. जगभरातील मीडियानेही याची दखल घेतली. नीट पेपर फुटी, गैरव्यवहार या विरोदात रस्त्यावर उतरलेल्या, आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेल्या तरूणाईची, जेन-झीची मोठी चर्चा झाली. सुरूवातील साधं वाटणारं हे आंदोलन बघता बघता पसरलं, देशव्यापी झालं आणि सर्वसामान्य जनता, राजकारणी यांच्यापासून ते सेलिब्रिटींपर्यंत ते पोहोचलं. या आंदोलनापुढे अखेर सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. धर्मेंद्र प्रदान यांना तर त्यांच्या शिक्षणमंत्रीपदाचाही राजीनामा द्यावा लागला आणि जेन-झीने एकच जल्लोष केला. यत्र-तत्र -सर्वत्र सध्या जेन-झी बद्दल चर्चा सुरू असतानातच, महाराष्ट्रात विश्वास नांगरे पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तरूण पिढीबद्दल, जेन-झीबद्दल विश्वास पाटील जे बोलले आहेत, ते खरंच विचार करण्यासारखं आहे. असं काय म्हणालेत विश्वास नांगरे पाटील ?

त्यांना कोणीच काही बोलू शकत नाही

‘आताच्या जेन-झीला बोलणंही मुश्किल झालंय’ असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले आहेत. ‘ सध्याच्या पिढीचा स्क्रीन टाईम प्रचंड वाढला आहे. सेकंदागणीक मन स्क्रोल होतंय. त्यातून केमिकल लोचा निर्माण झालाय. बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक गुणांकासह, कठीण परिस्थितीवरती मात करण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असायला हवी ‘असं देखील नांगरे पाटील म्हणालेत. मात्र सध्या त्यांना ( जेन -झी) कोणी काहीच म्हणू शकत नाही, असंही विश्वास पाटील यांनी नमूद केल. नागपूरमधील एका विशेष कार्यक्रमात, नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तरूण पिढीबद्दल मत व्यक्त केलं.

कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमादरम्यान विश्वास पाटील बोलत होते. गेल्या काही दिवसांमध्ये देशभर जेन-झीचं जे आंदोलन सुरू होतं, तशाच प्रकारची आंदोलनं नागपूरमध्येही झाली. त्यामुळे सध्याच्या पिढीशी, जन-झीशी बोलणंही मुश्किलझालंय, असा अनुभव विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितला. या पिढीचा स्क्रीन टाईम खूप वाढला आहे असं ते म्हणाले. त्यांनी विशेषतः ‘जेन-झी’ पिढीच्या जीवनशैलीकडे लक्ष वेधत सांगितलं की, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि सोशल मीडियावरील अवलंबित्वामुळे तरुणांच्या विचार करण्याच्या पद्धतीत मोठे बदल होत आहेत. आजच्या काळात मोबाईल, सोशल मीडिया आणि सततच्या स्क्रीन टाइममुळे अनेक तरुणांची एकाग्रता, सखोल विचार करण्याची क्षमता आणि भावनिक प्रतिक्रिया हाताळण्याची क्षमता कमी होत असल्याचे पाटील यांनी नमूद केलं. या बदलत्या जीवनशैलीमुळे व्यक्तीच्या विचारप्रक्रियेत आणि भावनिक संतुलनात एक प्रकारचा “केमिकल लोचा” निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरूणांना कसं समजवून सांगायचं हा एक प्रश्नच असल्याचं ते म्हणाले.

मानसिक ताकद विकसित झाली पाहिजे

बौद्धिक क्षमता महत्वाची आहेच, पण त्यासोबतच भावनिक परिपक्वता, सामाजिक जाणीव आणि प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जाण्याची मानसिक ताकदही विकसित झाली पाहिजे. आयुष्यात येणाऱ्या अडचणी, अपयश आणि संघर्षांना सामोरे जाण्यासाठी तरुणांनी स्वतःला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणे आवश्यक असल्याचं विश्वास नांगरे पाटील यांनी अधोरेखित केलं. ‘जेन-झी’ हीच देशाची भविष्यातील दिशा ठरवणारी पिढी आहे, असे सांगताना त्यांनी या पिढीशी संवाद साधण्याचे महत्त्वही अधोरेखित केलं. मात्र, सध्याच्या काळात या पिढीला योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांच्यापर्यंत विचार पोहोचवणे हे अधिक आव्हानात्मक झालं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us