
औरंगजेबावरून सुरू झालेले राजकारण मुस्लिम द्वेषावर येऊन ठेपणार हे सांगायला ज्योतिषाची खासा गरज नाही. देशातील अनेक भागात सध्या जाती-जातीत, धर्मा-धर्मात द्वेषाची भावना दिसून येत असल्याने चिंता वाढली आहे. त्यात राज्यात औरंगजेबाच्या कबरी आडून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. विरोधक या सर्व द्वेषासाठी भाजपाला दूषणं देत असतानाच आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विधान सध्या चर्चेत आले आहे.
गडकरींचे मनावर घ्याल की नाही?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरमधील अल्पसंख्याक संस्थेच्या दीक्षांत समारंभात जे बोलले त्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे.” मुस्लिम समाजाला सर्वात अगोदर शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. जो वाचेल, तोच पुढे जाईल.” असे गडकरी म्हणाले. मुस्लिम तरुणांनी एपीजे अब्दुल कलाम आणि मौलाना आझाद यांच्यासारखे होण्याचा विचार करावा असे गडकरी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय मंचावर एकच वादळ आले आहे. विशेष म्हणजे गडकरी यांच्या या वक्तव्याचे महाविकास आघाडीसह विरोधी गोटातून स्वागत करण्यात आले आहे.
बेधडक गडकरी
या कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक मुद्दांवर त्यांचे बेधडक विचार मांडले. ” एखादी व्यक्ती त्याच्या जाती, पंथ, धर्म, भाषा किंवा लिंगावरून ओळखली जात नाही, तर केवळ त्याच्या गुणांवरून ओळखली जाते. म्हणूनच आपण जात, पंथ, धर्म, भाषा किंवा लिंगावरून कोणाशीही भेदभाव करणार नाही. मी राजकारणात आहे आणि येथे हे सर्व चालू आहे, परंतु मला मते मिळतील किंवा नसतील तरीही मी हे नाकारतो.” असे ते म्हणाले.
मी माझ्या तत्त्वावर ठाम
जातीच्या आधारे बरेच लोक मला भेटायला येतात. मी ५०,००० लोकांना सांगितले, ‘जो करेलगा जात की बात, उसके कस के मारूंगा लात.’ माझ्या मित्रांनी मला सांगितले की मी हे बोलून स्वतःचे नुकसान केले असेल. पण मला त्याची चिंता नाही; जर कोणी निवडणूक हरला तर तो आपला जीव गमावत नाही. मी माझ्या तत्वांवर टिकून राहीन, असे वक्तव्य करून गडकरी यांनी सर्वांनाच थेट इशारा दिला आहे.
गडकरी यांच्या या विधानाचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने या विधानाचे स्वागत केले आहे. सच्चर आयोगाचा दाखला देत मुस्लिमांनी शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी केले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी सुद्धा गडकरी यांच्या वक्तव्याचे स्वागत केले.