कोण आहेत बिरसा मुंडा ज्यांना आदिवासी क्रांतीसूर्य मानतात

अपनी धरती, अपना राज. जल, जंगल, जमिनीसाठी इंग्रजांविरुद्ध विद्रोह केला.

कोण आहेत बिरसा मुंडा ज्यांना आदिवासी क्रांतीसूर्य मानतात
बिरसा मुंडा
Image Credit source: tv 9
| Updated on: Nov 14, 2022 | 11:46 PM

नागपूर : बिरसा मुंडा यांचा जन्म मुंडा कुटुंबात १५ नोव्हेंबर १८७५ साली झाला. बालपणी ते सुंदर बासरी वाजवित असतं. छत्तीसगड राज्यातल्या आदिवासी भागात बालपण गेलं. वडिलांनी त्यांना मिशन स्कूलमध्ये पाठविलं. शिक्षण घेतलं पण, घरची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. इंग्रजांची नोकरी करावी, असं त्यांच्या वडिलांना वाटायचं. पण, बिरसा यांनी शिक्षणाचा उपयोग आदिवासींचं जीवनमान उंचावण्यासाठी केला. आदिवासींचं जीवन अभ्यासलं. जंगलात अनेक दिवस काढले. आदिवासींमध्ये जनजागृती केली.

भारतीय संस्कृती, आयुर्वेद समजून घेतलं. औषधी विज्ञानात पारंगत झाले. रुग्णांची सेवा करू लागले. घर स्वच्छ ठेवा. खोटं बोलू नका. एकजूट राहा. निर्णय पंचायतकडून करा, असा संदेश त्यांनी आदिवासींना दिला.

इंग्रजांनी आदिवासींना बेदखल केले. त्यांच्या जल, जंगल, जमिनीवर अधिकार गाजविले. तेव्हा बिरसा यांनी आदिवासींना संघटित केलं. अपनी धरती, अपना राज. जल, जंगल, जमिनीसाठी इंग्रजांविरुद्ध विद्रोह केला.

बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वात १८९९ मध्ये सात हजार लोकं एकत्र आले. इंग्रज आणि आदिवासी यांच्यात डोम्बरी पहाडी येथे चकमक झाली. त्यात महिला, मुलं मारले गेले. त्यानंतर भूमिगत राहून बिरसा मुंडा काम करत होते. जंगल हेच त्यांच्यासाठी शिबिरस्थान होते.

काही दिवसांनी फितुरी करण्यात आली. बिरसा मुंडा यांना अटक करण्यात आली. कैदेत असताना वयाच्या २५ व्या वर्षी ९ जून १९०० मध्ये बिरसा मुंडा यांचा मृत्यू झाला. इंग्रजांनी कैदेत असताना विष प्रयोग करून बिरसा यांना ठार केल्याचा आरोप केला जातोय.

देशभरात विशेषता बिहार, ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, प. बंगाल या भागात बिरसा मुंडा यांना क्रांतीसूर्य मानलं जातं. १५ नोव्हेंबरला बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी बांधव साजरी करतात.