Nashik | डाव्या चळवळीला धक्का; ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड नामदेवराव गोडसे यांचे निधन

| Updated on: Jan 19, 2022 | 4:01 PM

कॉम्रेड नामदेवराव गोडसे यांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी विविध आंदोलन केले. तुरुंगवास भोगला. गोवा मुक्तिसंग्रामातही ते सक्रिय सहभागी राहिले.

Nashik | डाव्या चळवळीला धक्का; ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड नामदेवराव गोडसे यांचे निधन
Namdevrao Godse
Follow us on

नाशिकः ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, कम्युनिष्ट पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते कॉम्रेड नामदेवराव शिवराम गोडसे (Namdevrao Godse) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. गोडसे यांनी मंगळवारी सायंकाळी संसरी येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी शांताबाई, मुले अजय आणि संजय, मुलगी मीरा, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यक अशा सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

गोवा मुक्तिसंग्रामात सक्रिय सहभागी

कॉम्रेड नामदेवराव गोडसे यांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी विविध आंदोलन केले. तुरुंगवास भोगला. गोवा मुक्तिसंग्रामातही ते सक्रिय सहभागी राहिले. इगतपुरीचे पहिले आमदार कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने, माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड, कॉम्रेड गोविंद पानसे, कॉम्रेड एस. ए. डांगे, कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील यांच्योसोबत गोडसे यांनी काम केले होते.

सामाजिक कार्यातही अग्रेसर

प्रा. एन. डी. पाटील यांच्यानंतर लगेचच गोडसे यांचे निधन हे परिवर्तनवादी डाव्या चळवळीला बसलेला मोठा धक्का असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले जेष्ट स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड नामदेवराव शिवराम गोडसे यांच्या निधनाने नाशिकच्या सामाजिक चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

भुजबळांकडून श्रद्धांजली

शोकसंदेशात मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते नामदेवराव गोडसे यांनी गोवा मुक्ती संग्रामाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. शेतकरी आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होते. याकरिता त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. कॉम्रेड नामदेवराव हे नेहमी समाजकार्यात अग्रेसर राहिले. स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव गोडसे यांच्या निधनाने नाशिकच्या सामाजिक चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने गोडसे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय गोडसे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो, असे मंत्री छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.

इतर बातम्याः

Nagar Panchayat Election result 2022 : द्राक्षपंढरी निफाडमध्ये भाजपचा सुपडा साफ; राष्ट्रवादीचे आमदार बनकरांनाही धक्का

Nagar Panchayat Election result 2022 : केंद्रीय मंत्री भारती पवारांना आमदार दिराची धोबीपछाड

Nashik Corona | 304 कोरोना मृतांच्या वारसांच्या खात्यात प्रत्येकी 50 हजार जमा; पण वाढत्या अर्जांनी वाढवली भीती