
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे आपल्या बेधडक आणि स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जातात. आज छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यमक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी राजकारणी लोकांचे कान टोचले आहेत. खासकरून जातीपातीच राजकारण्यांना जागा दाखवण्याचे आवाहन नाना पाटेकर यांनी मतदारांना केले आहे. तसेच देशातील सैनिकांना हवा तेवढा मान-सन्मान मिळत नाही याची खंत वाटते असंही त्यांनी म्हटले आहे. नाना पाटेकर यांनी आपल्या भाषणात नेमकं काय म्हटले याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
छत्रपती संभाजीनगरमधील एमजीएम विद्यापीठात आयोजित असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या 39 व्या आंतर विद्यापीठीय सेंट्रल झोन युवा महोत्सव कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, आत्ताची सामाजिक राजकीय परिस्थिती पाहून दम गुदमरल्या सारखे होत आहे, आपल्या अभिनयातून त्यावर आपण व्यक्त होऊ शकतो. प्रहार सिनेमावेळी मी 3 वर्ष मी सीमेवर राहिलो, तरुण मुलं सीमेवर निधड्या छातीने उभी असतात, हातात 147 असते.
पुढे बोलताना नाना पाटेकर यांनी, आपल्या देशात सैनिकांचा सन्मान होत नाही याची खंत वाटत आहे. आमच्यासाठी ते मरत आहेत, त्यांना जो सन्मान हवा तो आमच्याकडून मिळत नाही. परदेशात सैनिक आल्यावर प्रेसिडेंट उभं राहून सॅल्युट करतो, पण आपल्याकडे असे होत नाही असं म्हणत खंत व्यक्त केली.
राजकारण्यांवर बोलताना नाना पाटेकर यांनी, ‘काही राजकरणी आहेत जे जातीपतीचे राजकारण करतात, तू हा आहे, तू तो आहे असे म्हणून भेद करतात. मी कधी जातपात मानली नाही, पण आपल्याकडे जातीचे राजकारण होत आहे. कोण करतोय आणि कसे करत आहे हे सर्वांना माहीत आहे. यांना उत्तर मतदानातून द्यायचे. बदलाव तरुण आणू शकतात आणि तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे. फक्त गर्दीचा भाग होऊ नका’ असं विधान केलं आहे.