Nana Patole: कोल्हापुरातील मतदारांना ईडीची धमकी देणाऱ्या भाजप नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलं; नाना पटोले यांची टीका

| Updated on: Apr 04, 2022 | 5:14 PM

काही लोकांनी मतदारांना पेटीएमद्वारे पैसे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मतदारांनो तुम्ही हे पैसे घेऊ नका. आम्ही ईडीकडे (ED) या प्रकाराची तक्रार करणार आहोत.

Nana Patole: कोल्हापुरातील मतदारांना ईडीची धमकी देणाऱ्या भाजप नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलं; नाना पटोले यांची टीका
कोल्हापुरातील मतदारांना ईडीची धमकी देणाऱ्या भाजप नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलं; नाना पटोले यांची टीका
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: काही लोकांनी मतदारांना पेटीएमद्वारे पैसे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मतदारांनो तुम्ही हे पैसे घेऊ नका. आम्ही ईडीकडे (ED) या प्रकाराची तक्रार करणार आहोत. त्यामुळे तुमचीही चौकशी होऊ शकते, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी म्हटलं होतं. पाटील यांच्या या विधानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी जोरदार टीका केली आहे. भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच करत आहे हे वारंवार उघड झाले आहे. ईडी सारखी तपास यंत्रणा तर थेट भाजपाची शाखा असल्यासारखीच काम करत आहे. राजकीय नेत्यांवर कारवाईसाठी गैरवापर करण्यात येत असलेल्या ईडीची धमकी आता भाजपने कोल्हापुरातील मतदारांनाच दिली असून भाजपच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील मतदारांना तुमची ईडीकडून चौकशी होईल अशी धमकी दिली हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपाचा जनाधार घसरला आहे. स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्राच्या जनतेने जागा दाखवून दिलेली आहे. कोल्हापुरातील पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष जिंकणार हे निश्चित आहे. भाजपाला कोल्हापुरात पराभव दिसत असल्याने निराशेपोटी चंद्रकांत पाटील यांनी थेट मतदारांनाच धमकी दिली आहे. काही लोक पेटीएमच्या माध्यमातून पैसे वाटत असून तुम्ही ते पैसे घेतले तर त्याची चौकशी ईडीकडून केली जाऊ शकते अशी धमकी देण्यात आली आहे. आता ईडी हजार-पाचशे रुपयांची चौकशी करणार का? आणि ती चौकशी भाजपाच्या इशाऱ्यावर होणार का?, असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटलांचं मानसिक संतुलन बिघडलं

ईडी, आयकर, सीबीआय यांचा मागील सात वर्षात भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यात गैरवापर वाढला असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात भाजपाला सत्ता मिळाली नसल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. या नैराश्येतून ते केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन भितीचे वातावरण निर्माण करत आहेत. चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते अशी वक्तव्ये करत असतात. कोल्हापुरची स्वाभिमानी जनता मात्र या पोटनिवडणुकीतही चंद्रकांत पाटील व भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या:

Devendra Fadnavis: कोरोना काळात वेश्यांना देण्यात येणारे पैसे नातेवाईकांना दिले; फडणवीसांचा आघाडीवर गंभीर आरोप

Video Devendra Fadnavis | राज्य सरकारमध्ये भ्रष्टाचाराची 20-20 मॅच; देवेंद्र फडणवीस यांची सडकून टीका, गडचिरोलीतून भाजपचा जनआक्रोश मोर्चा

Arvind Sawant: मनसे बिनबुडाची झालीय, मनसेला बुड नाही आणि शेंडाही नाही; अरविंद सावंत यांची खोचक टीका