Ladki Bahin : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, 80 लाख लाभार्थी महिला…बड्या नेत्याच्या विधानाची चर्चा, सरकारला घेरलं!
या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 70-80 लाखांनी कमी करण्यात आली. महिलांची नावे लाभार्थी यादीतून हटवण्यात आली. तरीदेखील पुन्हा लाडक्या बहिणींवरच खापर फोडले जात आहे, अशा शब्दात पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

गजानन देशमुख, टीव्ही 9 मराठी, नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठं विधान केलं होतं. या योजनेमुळे सरकार आर्थिक अडचणीत आलं, असं झिरवाळ म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसेचे नेते नाना पटोले यांनी झिरवाळ यांची पाठराखण केली असून सरकारला धारेवर धरलंय. महागाई, सरकारचं अपयश यावर भाष्य करत त्यांनी महायुती सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभंं केलंय.
लाडकी बहीण योजना कारणीभूत नाही
नाना पटोले नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली. “महाराष्ट्र कर्जबाजारी आणि कंगाल होण्यास लाडकी बहीण योजना कारणीभूत नाही, तर मूठभर लोकांना राज्य लुटून देण्याचा सरकारचा कारभार यासाठी कारणीभूत आहे,” असा गंभीर आरोप पटोले यांनी केला.
महिलांची नावे लाभार्थी यादीतून हटवण्यात आली
तसेच, या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 70-80 लाखांनी कमी करण्यात आली. महिलांची नावे लाभार्थी यादीतून हटवण्यात आली. तरीदेखील पुन्हा लाडक्या बहिणींवरच खापर फोडले जात आहे, अशा शब्दात पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल केला. महागाई वाढत आहे. या महागाईच्या रुपात जनतेचे पैसे सरकारच्या तिजोरीतच जात आहेत. नरहरी झिरवाळ हे सरळ-साधे असून त्यांना सरकारचा मसुदा नाही, असा बोचरा हल्लाबोलही त्यांनी केलाय. काँग्रेसने सुरू केलेल्या संजय गांधी निराधार योजना, विधवा आणि वृद्धांसाठीच्या योजनांचे पैसे बंद करून ठेवले आहेत. लाभार्थ्यांना वर्षभर पैसे मिळत नसल्याने गाव-शहरांत त्यांचे हाल होत आहेत, असा गंभीर मुद्दाही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आम्ही ही योजना बंद पडू देणार नाही
दरम्यान, लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर आर्थिक ताण येतोय, असं अनेकदा बोललं जातं. तर दुसरीकडे काहीही झालं तरी आम्ही ही योजना बंद पडू देणार नाही, अशी सरकारने वेळोवेळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.