मुंबईतलं सर्वात अनोखं लग्न… फक्त 8 लोकं, छतावरच घेतले फेरे, श्रीमंती इतकी की…
मुंबईतील कृषा कोठारी आणि वरील शाह यांनी आपल्या घराच्या छतावर केवळ 8 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न करून नवा आदर्श ठेवला. श्रीमंत असूनही त्यांनी महागड्या समारंभाऐवजी साधेपणाला प्राधान्य दिले. अरबी समुद्राच्या विहंगम दृश्यासमोर, सुंदर सजावट आणि शांत वातावरणात पार पडलेले हे अनोखे लग्न सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

सध्या लग्नाचा सीजन सुरू आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये धुमधडाक्यात लग्न करण्याचे बेत आखले जात आहेत. बिहारच्या मोकामाचे आमदार अनंत सिंह यांच्या कन्येच्या लग्नात तर पैशाचा पाऊस पाडला जात आहे. पाण्यासारखा पैसा या लग्नावर खर्च केला जात आहे. त्यामुळे हे लग्न चर्चेत आलं आहे. मात्र, मुंबईतील आणखी एक लग्न तसंच चर्चेत आलं आहे. पण हे लग्न श्रीमंती वा बडेजावमुळे चर्चेत आलेलं नाहीये. तर अत्यंत साधेपणामुळे चर्चेत आलं आहे.
मुंबईचे कृषा कोठारी आणि वरील शाह यांचं हे लग्न सध्या चर्चेत आहेत. दोघेही श्रीमंत असूनही त्यांनी अत्यंत साधेपणाने लग्न केल्याने देशभरातील मीडियाने या लग्नाची दखल घेतली आहे. या जोडप्याने कोणत्याही महागड्या रिसॉर्ट वा अलिशान बँक्वेट हॉलमध्ये लग्न केलं नाही. तर बिल्डिंगच्या छतावर जाऊन सातफेरे घेतले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवळ आठ लोकांच्या उपस्थितीतच त्यांनी लग्न केलं आहे. या अनोख्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याला प्रचंड लाइक्स मिळत आहेत.
छतावरच लग्न
कृषा कोठारी आणि वरील शाह यांनी आपल्या आयुष्याचा सर्वात खास दिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी मुंबईतील आपल्या घराच्या छतावरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. या छतावरून शहरातील सुंदर इमारती आणि अरबी समुद्राचं विहंगम दृश्य दिसतं. संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य अस्ताला जात होता आणि सर्वत्र पिवळा धम्मक प्रकाश पडलेला होता, तेव्हाच त्यांनी लग्न लावलं. हे दृश्य पाहण्यासारखं होतं.
लग्नाच्या सजावटीकडे विशेष लक्ष देण्यात आलं होतं. भपकेबाज सजावट करण्याऐवजी सफेद फुलांनी सजावट करण्यात आली होती. सोबत बऱ्याच मोमबत्त्या लावण्यात आल्या होत्या. समुद्रातून येणारी थंड हवा आणि अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या प्रकाशामुळे हा छोटासा समारंभ अत्यंत सुंदर असा झाला.
View this post on Instagram
फक्त 8 पाहुणे
या लग्नातील सर्वात वेधक गोष्ट म्हणजे पाहुण्यांची संख्या. आजकाल लग्नाला शेकडो लोक येतात. त्यामुळे एखाद्या सभेसाठी गर्दी लग्नात दिसत असते. पण कृषा आणि वरील यांच्या लग्नाला केवळ जवळचे 8 लोकचं उपस्थित होते. या आठ लोकांच्या साक्षीने त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
या छोटेखानी विवाह समारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. @khushmag या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी या अनोख्या लग्नाचं स्वागत केलं आहे. तसेच या जोडप्याला भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छाही दिल्या जात आहेत.
