
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात असलेल्या बिल्लाळी गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे एका दुभत्या म्हशीचा मृत्यू झाला. कुत्रा चावल्यानंतर म्हैस एक महिनाभर जिवंत होती. या म्हशीचे दूध सुमारे 171 नागरिकांनी सेवन केल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने तात्काळ या सर्व नागरिकांना अँटी-रेबीजची प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता लसीकरण करून घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुखेड तालुक्यातील बिल्लाळी गावात किशन दशरथ इंगळे यांच्याकडे असणाऱ्या एका म्हशीला पिसाळलेला कुत्रा चावला होता. सुरुवातीचे काही दिवस ही म्हैस सामान्य होती, मात्र काही दिवसांनंतर ती आजारी पडली, मात्र तिला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा 5 ऑगस्टला मृत्यू झाला. या म्हशीचे दूध विकले जात होते, त्यामुळे जवळपास 5 गावातील 171 लोकांनी या म्हशीच्या दुधाचे सेवन केल्याचे समोर आले आहे.
म्हशीचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याने हे सर्व लोक घाबरले आहेत. यातील अनेकांनी तातडीने आरोग्य केंद्रात धाव घेतली आणि रेबीज प्रतिबंधक लस टोचून घेतली. सध्या या गावात आरोग्य विभागाचे पथक दाखल झालेले आहे. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत अशी माहिती समोर आली आहे.
रेबीज हा एक अतिशय घातक आजार आहे. संक्रमित प्राण्याच्या चाव्यामुळे हा आजार होतो. कुत्रे, मांजरे, कोल्हे, वटवाघळ यांच्याकडून रेबीजचा प्रसार मानवात होतो. या आजाराची लागण झाल्यानंतर रेबीज विषाणू मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मेंदूला दाह होऊन रुग्णाला झटके येणे, Hydrophobia, आक्रमकता वाढणे अशा लक्षणांचा सामना करावा लागतो. अशी लक्षणे दिसू लागल्यावर रुग्णाचा मृत्यू होतो.
त्यामुळे तुम्हाला प्राणी चावल्यास, एकदे लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घेणे गरजेचे आहे. प्राणी चावल्यानंतर लगेच जखम साबणाने धुवा, रेबीज लस घ्या. तसेच पाळीव कुत्र्यांचे लसीकरण करा मात्र वेळेवर वैद्यकीय मदत घेणे हे या आजारापासून बचाव करण्याचे मार्ग आहेत. या सर्व गोष्टींची योग्य काळजी घेतल्यास रेबीज टाळता येतो, मात्र याकडे दुर्लक्ष झाल्यास तो प्राणघातक ठरू शकतो.