मुंबई : काल मवाळ झालेल्या शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज थेट भाजप विरोधात डरकाळीच फोडली. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर (ED) करून आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. बदनाम करण्याचं काम सुरू आहे. ते भ्रमात आहेत. पण आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही. तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. याद राखा, मुंबईत शिवसेनाच दादा आहे. आम्हीच मुंबईत दादागिरी करणार आहोत, असा इशाराच संजय राऊत यांनी सकाळी दिला आहे. त्याला आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत तुमची जागा आता बाहेर नाही, तुमची जागा आता आत असे म्हणत राणेंनी राऊतांवर हल्लाबोल चढवला आहे. सध्या शिवसेना विरुद्ध राणे हा वाद पुन्हा पेटला आहे. तुम्ही फक्त मातोश्रीपुरते मर्यादीत आहात, असा टोलाही राणेंना लगावाल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोठडीत असलेल्या नितेश राणेंना आजच जामीन मिळाला आहे, त्यानंतर राणेंनी ट्विटरवरून डरकाळी फोडली आहे.
नारायण राणेंचा राऊतांना काय इशारा?
नारायण राणेंनी ट्विट करत म्हटले आहे की, तुमची जागा बाहेर नाही आता “आत” तेव्हा संजय राऊत धमक्या देणे बंद करा. कोणी भीक नाही घालत तुमच्या धमक्यांना आणि भाजपवाले तर नाहीच नाही. संजय राऊत यांचे वक्तव्य, मुंबईचा दादा “ शिवसेना ” पण ती फक्त “मातोश्रीपुरतीच ”. गुन्हे करायचे आणि मी नाही त्यातला असे म्हणायचे ही वेळ संजय राऊत यांच्यावर आली आहे. धमक्या देण्याचे दिवस @rautsanjay61 आता संपले आहेत. असा गर्भित इशारा देणारे ट्विट नारायण राणे यांच्याकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे आता संजय राऊतही राणेंना जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.
नारायण राणेंचं ट्विट
तुमची जागा बाहेर नाही आता “आत” तेव्हा संजय राऊत धमक्या देणे बंद करा कोणी भीक नाही घालत तुमच्या धमक्यांना आणि भाजपवाले तर नाहीच नाही.
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 9, 2022
संजय राऊतांचे आरोप काय?
ईडीचे सर्वाधिक खटले महाराष्ट्रातच कसे? यूपी, बिहार आणि दिल्लीत कसे नाहीत?, असा सवाल करतानाच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठीचा हा डाव आहे. त्यासाठीच हे षडयंत्र सुरू आहे, असा दावाही राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हा इशारा देतानाच लेटरबॉम्बही टाकला आहे. अनिल देशमुखांच्या शेजारील कोठडीत जावं लागेल असं भाजप नेते वारंवार सांगत आहे. मी त्यांना सांगतो, तुम्हाला देखील तिथेच जावं लागेल. तुमची पापं जास्त आहेत. आम्ही शुद्ध आहोत. सरकार पडत नाही म्हटल्यावर आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता जास्त बोलत नाही. ईडीला कायदेशीरपणे कारवाई करायची आहे तर त्यांनी करावी. ईडीच्या कार्यालयात काय चाललंय? याचे सूत्रधार कोण आहेत? हे लवकरच मी तुम्हाला सांगेन, असं सांगतानाच तुम्ही मुंबईत दादागिरी करता, महाराष्ट्रातील लोकांना बाहेरची लोकं सुपाऱ्या घेऊन येतात. 12-12 तास डांबून ठेवतात. धमक्या देतात. मुंबई पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी असं माझं आवाहन आहे, असं राऊत म्हणाले.