Supriya Sule : सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद…पवार गटाच्या NDA तील सहभागावर खासदाराचं मोठं विधान!
नरेश म्हस्के हे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) एनडीएतील सहभागावर भाष्य केले.

राष्ट्रादीच्या विलीनीकरणाचा विषय मागे पडलाय, असे दोन्ही राष्ट्रवादी गटांकडून सांगितले जात आहे. हा विषय सध्या मागे पडला असला तरी शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट आगामी काळात मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे आगामी काळात राष्ट्रवादी पक्ष एनडीएत सहभागी होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या सर्व घडामोडी एकीकडे घडत असताना आता शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते तथा खासदार नरेश म्हस्के यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मंत्रिपदावर तसेच राष्ट्रवादीच्या एनडीएतील सहभागावर महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.’
सुप्रिया सुळे मंत्री झाल्या तर…
नरेश म्हस्के हे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) एनडीएतील सहभागावर भाष्य केले. “सुप्रिया सुळे या एनडीएमध्ये येऊन मंत्री झाल्या तर आम्हाला आनंदच होईल. सुप्रिया सुळे या आमच्या ताई आहेत. त्या सरकारमध्ये सामील झाल्यास आम्हाला आनंद होईल,” असं सूचक विधान नरेश म्हस्के यांनी केलं. सुप्रिया सुळे यांनी एनडीएमध्ये प्रवेश करून मंत्रिपद स्वीकारल्यास त्यांचं स्वागत करू, असंही पुढे नरेश म्हस्के म्हणाले.
विरोधी पक्षाचे खासदार या विधेयकाला पाठिंबा देणार
नरेश म्हस्के यांनी पुढे बोलताना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवरही भाष्य केलं. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा मिळावा यासाठी खासदारांना 150 कोटींची ऑफर दिली जात आहे, असा दावा राऊतांनी केला होता. संजय राऊत यांना माहिती आहे की मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर होणार आहे. विरोधाला विरोध करण्यासाठी त्यांची ही भूमिका आहे. विरोधी पक्षाचे खासदार या विधेयकाला पाठिंबा देणार आहेत. म्हणून संजय राऊत खासदारांवर टीका करत आहेत. तसेच ते आरोप करत आहेत. दरम्यान, नरेश म्हस्के यांनी सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद मिळाले तर स्वागत करू, असे विधान केल्यामुळे वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. त्यामुळे भविष्यात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.