गुजरातहून शिर्डीला निघाले, नाशिकला पोहोचले अन् पुढच्या मिनिटाला… साई भक्तांवर काळाचा घाला

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एकूण चार जणांना जीव गमवावा लागला. सुरतहून शिर्डीकडे जाणाऱ्या साई भक्तांच्या गाडीचा येवला येथे अपघात होऊन तीन ठार झाले, तर कोपरगावजवळ खड्ड्यांमुळे एका तरुणाचा बळी गेला.

गुजरातहून शिर्डीला निघाले, नाशिकला पोहोचले अन् पुढच्या मिनिटाला... साई भक्तांवर काळाचा घाला
nashik accident
| Updated on: Oct 29, 2025 | 12:34 PM

नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटनांमध्ये एकूण चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सुरतहून शिर्डीकडे दर्शनासाठी घालेल्या साई भक्तांवर नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर काळाचा घाला पडला. तर नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्यांनी कोपरगावजवळ एका तरुणाचा बळी घेतला. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत अवघ्या काही तासांत झालेल्या अपघातांमुळे एकूण चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे सर्वत्र हळहळ पसरली आहे.

गुजरातच्या सुरतमधून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीकडे निघालेल्या भाविकांच्या फॉर्च्युनर गाडीचा येवला तालुक्यात भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव गाडी तीन वेळा पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात सुरत येथील तीन साई भक्तांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

यानंतर जखमींना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. साई भक्तांवर आलेल्या या संकटामुळे मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

खड्ड्यांमुळे गमावला जीव

तर दुसरीकडे नगर-मनमाड या सतत चर्चेत असलेल्या महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे कोपरगाव येथील आदित्य देवकर या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. महामार्गावर मोठे खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्याचा अंदाज आला नाही. खड्ड्यात आदळल्याने आदित्य रस्त्यावर पडला. त्याचवेळी मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेला नगर-मनमाड रस्ता आता मृत्यूचा महामार्ग बनला आहे, अशा संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. दरम्यान प्रशासनाने तातडीने या मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याची दुरवस्था दूर करावी, अन्यथा मोठे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

हेही वाचा : 

कुठे बसने चिरडलं, तर कुठे कारची धडक; महाराष्ट्रात अपघातांचा थरार

आधी पोटदुखी, मग ताप, तपासणीत समोर आलं धक्कादायक सत्य, 7 वर्षाच्या देवांशीला कसं मिळालं जीवनदान?