
नाशिकमधील बहुचर्चित कॅप्टन फाईल्स प्रकरणाचा मुख्य सूत्रधार भोंदू बाबा अशोक खरात याच्याभोवती आता कायद्याचा फास अधिक घट्ट झाला आहे. एकीकडे याप्रकरणाची एसआयटी (SIT) चौकशी सुरु असतानाचा दुसरीकडे आता प्राप्तिकर विभागाने (Income Tax) या प्रकरणात अधिकृत प्रवेश घेतला आहे. अशोक खरातने भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या माध्यमातून जमवलेल्या अफाट संपत्तीची आता चौकशी केली जाणार आहे. यामध्ये अनेक बड्या लोकांची नावे समोर येणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
भोंदू बाबा अशोक खरातच्या दहशतीमुळे अनेक महिला तक्रार करण्यास धजावत नव्हत्या. मात्र, एसआयटी पथकाने महिलांना विश्वासात घेऊन त्यांचे समुपदेशन केले. यानंतर आणखी तीन पीडित महिलांनी खरात विरोधात तक्रार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या नवीन तक्रारींमुळे खरातवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचे स्वरूप अधिक गंभीर झाले आहे.
तसेच एसआयटी तपासात खरातच्या नावावर आणि त्याच्याशी संबंधित तब्बल ५२ मालमत्तांचे पुरावे मिळाले आहेत. यामध्ये नाशिक शहर, सिन्नर, गंगापूर आणि शेजारील अहिल्यानगर जिल्ह्यात जमिनींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी ११ मालमत्ता थेट खरातच्या नावावर असून, उर्वरित मालमत्तांमध्ये बेनामी व्यवहार झाल्याचा संशय आहे.
अशोक खरातसाठी जमिनींचे व्यवहार करणारा आणि कागदपत्रांची फेरफार करणारा मुख्य एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या चौकशीतून खरातने कुठून आणि कोणाकडून जमिनी घेतल्या, याचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. अशोक खरातने कोट्यवधी रुपयांची माया जमवली असली तरी, त्याने कधीही याचे अधिकृत विवरणपत्र (IT Returns) भरले नसल्याचे प्राथमिक तपासात पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता आयकर विभाग त्याच्या उत्पन्नाचे स्रोत, बँक खात्यांमधील मोठे व्यवहार आणि रोख रकमेच्या हालचालींची तपासणी करणार आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, खरातच्या सामाईक सातबाऱ्यांवर काही शासकीय अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची नावे असल्याची चर्चा आहे. खरातला प्रशासकीय स्तरावर कोणाचे संरक्षण होते का? याचीही चौकशी सुरू आहे. खरातच्या आश्रमाला किंवा संस्थांना मोठ्या प्रमाणावर देणग्या देणारे लोक कोण आहेत? त्याच्या आर्थिक व्यवहारात भागीदार कोण होते? याचा शोध घेण्यासाठी बँक लिंकिंग पद्धतीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे अशोक खरातचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचे बोललं जात आहे.