
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे शोषण केल्याचे समोर आले आहे. अगोदर एका महिलेने पोलिसात तक्रार केल्यानंतर आता त्याच्याविरोधात तक्रार करण्यासाठी अनेक महिला समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने तर मी गर्भवती असताना त्याने माझ्यावर अत्याचार केला, असा आरोप केला आहे. दरम्यान, आता याच अशोक खरातविरोधात लैंगिक शोषणाचा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याभोवती कारवाईचा फास अधिक आवळला जात आहे. असे असतानाच आता पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला हा खरात पुरता घायकुतीला आला आहे. चौकशीनंतर त्याच्यात त्राण राहिलेले नाहीत. तो ढसाढसा रडत आहे. त्याला चालताही येत नसल्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार भोंदू अशोक खरातवर आज (22 मार्च) तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये खरातने एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. धार्मिक विधी आणि भविष्याच्या नावाखाली त्याने माझे शोषण केले आहे, असा आरोप पीडित महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. ही तक्रार दाखल होताच आता अशोक खरात हा आणखी अडचणीत सापडला आहे.
अशोक खरातवर असलेल्या आरोपांची चौकशी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) केली जात आहे. त्याच्या चौकशाचा हा सलग तिसरा दिवस आहे. अशोक खरातची शनिवारी (21 मार्च) तब्बल सात तास चौकशी झाली. त्यावेळी एसआयटी पथकाच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते उपस्थित होत्या. या चौकशीत खरातची मालमत्ता, आर्थिक व्यवहार, जमीन खरेदी, महिलांशी संबंधित आरोप याविषयी खरातला विचारण्यात आले. आज (22 मार्च) पुन्हा एकदा खरातची कसून चौकशी करण्यात आली.
या चौकशीनंतर मात्र खरात पुरता हतबल झाल्याचे दिसले. त्याच्यात त्राण उरलेला नव्हता. पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर अशोक खरात ढसाढसा रडल्याचे सांगितले जाते. तसेच कधीकाळी तंत्र-मंत्राची शक्ती असल्याचा दावा करणारा हा खरात मात्र पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी केल्यानंतर माझ्यात ताकद राहिलेली नाही, असे म्हणत आहे.
त्याला चालताही येत नसल्याचे काही व्हिडीओही समोर आले आहेत. हा व्हिडीओ पाहून नाशिकचे पोलीस अशोक खरातची चांगलीच ‘काळजी’ घेत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.