भोंदू बाबा अशोक खरातच्या पापाचा घडा भरला, 10 दिवसात फास आवळला, 17 मार्चपासून काय काय घडलं?

भोंदू बाबा अशोक खरात याच्या विरोधात डझनभर गुन्हे दाखल आहेत. तो आतापर्यंत दोनदा पोलीस कोठडीत दाखल झाला आहे. साधारण १७ मार्च ते २९ मार्च दरम्यानच्या सर्व धक्कादायक घडामोडींचा सविस्तर आढावा येथे वाचा.

भोंदू बाबा अशोक खरातच्या पापाचा घडा भरला, 10 दिवसात फास आवळला, 17 मार्चपासून काय काय घडलं?
ashok kharat
| Updated on: Mar 30, 2026 | 9:29 AM

अध्यात्माच्या आणि भीतीचा वापर करून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहेत. याप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. भोंदू बाबा अशोक खरातविरुद्ध नाशिक पोलिसांनी अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. साधारण १७ मार्चपासून सुरू झालेल्या या कारवाईत आतापर्यंत अत्याचार, सक्तीने गर्भपात आणि खंडणी अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा ताबा विशेष तपास पथकाने (SIT) घेतला असून खरातच्या जाळ्यात अडकलेल्या अनेक पीडिता आता समोर येत आहेत.

अशोक खरातविरुद्ध १७ मार्च रोजी पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून २९ मार्चपर्यंत एकामागोमाग एक गंभीर गुन्ह्यांची मालिका समोर आली आहे. विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणाचा फास आवळला असून खरात सध्या पोलिसांच्या कडक पहाऱ्यात आहे.

अशोक खरातच्या अटकेचा आणि गुन्ह्यांचा घटनाक्रम

  • १७ मार्च (रात्री उशिरा): खरातविरुद्ध फसवणूक आणि अत्याचाराचा पहिला गुन्हा दाखल झाला.
  • १८ मार्च (पहाटे ३:०० वाजता): नाशिकच्या गुंडाविरोधी पथकाने तातडीने कारवाई करत खरातला बेड्या ठोकल्या.
  • १९ मार्च: प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती मोठी असल्याने विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती करण्यात आली.
  • २१ मार्च: तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. खरातविरुद्ध अत्याचार आणि एका पीडितेचा सक्तीने गर्भपात केल्याचे दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले गेले.
  • २३ मार्च : खरातविरुद्ध अत्याचाराचे आणखी तीन गुन्हे दाखल झाले.
  • २४ मार्च: एका अविवाहित युवतीने धाडस दाखवून खरातच्या कृत्यांविरुद्ध फिर्याद दिल्याने आणखी एका अत्याचाराच्या गुन्ह्याची नोंद झाली.
  • २५ मार्च: याप्रकरणी केवळ शारीरिक शोषणच नव्हे, तर पीडितांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकारही समोर आले. २५ मार्चला त्याच्याविरुद्ध खंडणीचा पहिला गुन्हा दाखल झाला.
  • २७ मार्च: अशोक खरातवर अत्याचार आणि खंडणीचे आणखी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

अशोक खरात प्रकरणी तपासादरम्यान असे समोर आले आहे की, अशोक खरात हा स्वतःला आध्यात्मिक गुरू भासवून महिलांना देवाचा कोप होण्याची भीती घालत असे. या भीतीचा गैरफायदा घेऊन त्याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. एसआयटीने खरातच्या मालमत्तेची आणि त्याने जमवलेल्या संपत्तीचीही चौकशी सुरू केली आहे. त्याने काही पीडितांना व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेल केल्याचाही संशय पोलिसांना आहे.

दरम्यान अशोक खरातला दोन टप्प्यांत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. १८ ते २४ मार्च या पहिल्या टप्प्यात त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली, तर २५ ते २९ मार्च या दुसऱ्या टप्प्यात एसआयटीने त्याच्या आर्थिक व्यवहारांची आणि खंडणीच्या प्रकरणांची सखोल चौकशी केली. या काळात पोलिसांनी खरातच्या आश्रमातून आणि निवासस्थानातून महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. तसेच याप्रकरणी नाशिक पोलिसांनी या भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकलेल्या इतर महिलांनाही न घाबरता पुढे येण्याचे आवाहन केले आहे. पीडितांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आश्वासनही प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us