जिथं आहात तिथेच राहा, खाण्याच्या वस्तू आणून ठेवा; ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या महापौरांचं आवाहन

Nashik Cloudburst Alert : नाशिकमध्ये उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री आणि महापौर हिमगौरी आडके यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

जिथं आहात तिथेच राहा, खाण्याच्या वस्तू आणून ठेवा; ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या महापौरांचं आवाहन
Nashik Heavy Rain Alert
Image Credit source: Google
| Updated on: Jul 06, 2026 | 6:41 PM

राज्याच्या विविध भागात पावसाचा कहर पहायला मिळत आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळित झाले आहे. अशातच आता नाशिकमध्ये उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. आज नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री आणि महापौर हिमगौरी आडके यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

नाशिकमध्ये ढगफुटीचा इशारा

आयुक्त मनीषा खत्री यांनी म्हटले की, ‘200 मिमीच्या वर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आपल्याकडे ढगफुटीची शक्यता आहे, एका दिवसात जास्त पावसाची शक्यता आहे. आज सायंकाळी 6 वाजेपासून पाऊस सुरू होईल. मध्यरात्री 1 ते 10 पर्यंत अति मुसळधार पाऊस येईल. सकाळी नंतर पाऊस कमी होईल. पण नदी नाल्यातील पाण्याचा प्रवाह जास्त असेल. सावधगिरी म्हणून शाळा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. झाडे कोसळतात, कामे सुरू आहेत त्यामुळे नागरिकांनी प्रवास टाळावा.’

खाण्याच्या आणि जेवणाच्या वस्तू सोबत ठेवा…

नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगौरी आडके यांनी म्हटले की, ‘हा पाऊस वाढणार आहे, वेग वाढला तर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. उद्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले आहेत की, जिथं शक्य आहे तिथं बाहेर पडू नका. खाण्याच्या आणि जेवणाच्या वस्तू आधीच आणून ठेवा. उद्या घराबाहेर पडण्याचे टाळा, झाड पडू शकतं असे वाटल्यास अलर्ट राहा आणि कळवा. आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यादृष्टीने काळजी घ्या.’

घराबाहेर पडू नका

पुढे बोलताना हिमगौरी आडके यांनी सांगितले की, ‘पडका वाडा, इमारत माहिती असल्यास मनपाला कळवा. सिंहस्थ कुंभाची कामे करतोय, तिथं पाहणी करत आहोत, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेत. उद्या घराबाहेर पडू नये. हॉस्पिटलसाठी रुग्णवाहिका आणि इतर व्यवस्था करून ठेवा. सतर्कतेचा इशारा आहे, त्यामुळे उद्या घराबाहेर पडणे टाळा. प्रशासनाने मान्सून टास्क फोर्स नेमला आहे, ते सर्व्हे करतील आणि कार्यवाही करतील. पावसाचा वेग किती वाढतोय त्यानुसार प्रत्यक्ष पाहणी करून घरं खाली करू. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर निवाऱ्याची व्यवस्था करू. उद्या ऑफिसला न जाता वर्क फ्रॉम करा.’

नाशिक जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

नाशिकमध्ये उद्या ढगफुटी सदृश्य पावसाचा उद्या वर्तवण्यात आल्याने नाशिक जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. गोदाकाट परिसरात नागरिकांना पोलीस प्रशासन व महापालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठ परिसरात नागरिकांनी वाहने लावू नये , विनाकारण नदीकाठच्या परिसरात फिरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Follow Us