
नाशिक : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले त्यावेळी फक्त आमदार गेले होते. त्यानंतर हळूहळू माजी आमदार, खासदार, माजी खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करू लागले. त्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रवेश होत होते. त्यामुळे ठाकरे गटाला एक प्रकारे मोठी गळतीच लागली होती. एकनाथ शिंदे यांना त्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह ही मिळालं त्यानंतर पक्षातील प्रवेश फार मोठ्या प्रमाणात वाढले नाही. मात्र आता दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नव्याने संघटनात्मक बांधणी केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात विधानसभा निहाय बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यात संपर्कप्रमुख पदापासून ते गण प्रमुखा पर्यन्त जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाणार आहे.
खरंतर मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याने ठाकरे गटाकडून पुन्हा संघटनात्मक बांधणीवर भर दिला जाणार आहे. रिक्त झालेल्या जागाही लवकरात लवकर भरण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहे. याबाबत मातोश्रीवरुन याबाबत आदेश आल्याचे सांगण्यात आले आहे.
पुढील पंधरवाड्यात या जागा भरल्या जाणार आहे. त्यामध्ये निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना यावेळी डच्चू दिला जाणार आहे. तर महत्वाच्या अनेक पदांवर असलेल्या पदाधिकाऱ्यांची खांदेपालट होणार आहे. त्यामध्ये संपर्कप्रमुख, महानगरप्रमुख, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख, विधानसभाप्रमुख, महिला आघाडी याबाबतही नियुक्तीच्या हालचाली सुरू आहे.
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर अनेक माजी नगर सेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्याकडे अनेक पदे होती. पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या रिक्त असल्याने आणि नगरसेवकही नसल्याने नागरिकांमध्ये असलेला वावर कमी झाला आहे. यामध्ये आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची पदे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे.
नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी हे शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहे. त्यानंतर त्यांनी पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांना ठाकरे गटातून शिंदे यांच्याकडे नेण्याची भूमिका बजावली होती. त्यात त्यांना शिंदेंच्या शिवसेनेत तात्काळ पदे मिळत असल्याने ठाकरे गटातील रिक्त पदे कधी भरली जाणार अशी चर्चा सुरू झाली होती.
त्याच पार्श्वभूमीवर आता विधानसभा निहाय बैठका झाल्यावर नियुक्त्या केल्या जाणार असल्या तरी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन नियुक्त्या होणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कोणत्या नेत्याला कोणती जबाबदारी मिळते यासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामध्ये संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि महानगरप्रमुख ही जबाबदारी कुणाला मिळते याकडे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे लक्ष लागून आहे.