ठाकरेंच्या आमदारांना भुजबळांचं आव्हान, मैदान बाजार समितीचं पण आव्हान आमदारकीचं, राजकीय चर्चेला उधाण

| Updated on: Apr 25, 2023 | 6:23 PM

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे आणि नरेंद्र दराडे यांना छगन भुजबळ यांनी खुलं आव्हान दिले आहे. आमदारकीला माझ्या समोर उभे राहा असे आवाहन दिले आहे.

ठाकरेंच्या आमदारांना भुजबळांचं आव्हान, मैदान बाजार समितीचं पण आव्हान आमदारकीचं, राजकीय चर्चेला उधाण
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे या बंधूंनी आमदारकिला माझ्या विरुद्ध उभे राहून दाखवावे असे खुलेआम आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीन दिले आहे. येवला येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भुजबळ यांनी हे आव्हान दिले आहे. भुजबळांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलच्या प्रचार सभेकरिता आज भुजबळ येवल्यात होते. नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे हे विधानपरिषदेवर आमदार आहे. मात्र, अनेक वर्षांपासून येवल्यात छगन भुजबळ आमदार आहे. त्यांना पाडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, भुजबळ आपल्या विकासाच्या जोरावर आमदार म्हणून निवडून येत आहे. त्याच दरम्यान भुजबळ यांनी पुन्हा एकदा आव्हान दिले आहे.

मला जेव्हा येवल्यात आणल्या गेले तेव्हा अनेक कार्यकर्ते माझ्यासाठी मुंबईत आले होते. येवल्याच्या विकासासाठी मला इथ आणलं गेलं. येवल्यात काम करण्याची संधी असल्याने पवार साहेबांनी मला इथे पाठविले. येवल्याच्या विकासासाठी आपल्याला संधी दिली त्या येवल्याच्या विकासासाठी आपले अविरत प्रयत्न सुरू आहेत असं भुजबळ म्हणाले.

सार्वजनिक पदावर सर्वांना संधी मिळाली पाहिजे. इतरांनी सांगितलेल्या वेळी राजीनामा दिला. मात्र यांनी दहा वर्ष सत्ता भोगली अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी माणिकराव शिंदे आणि दराडे बंधूंचा चांगलाच समाचार घेतला.

हे सुद्धा वाचा

भुजबळ म्हणाले या दराडे बंधूंनी बाजार समिती निवडणुकीत स्वतः एकानेही उमेदवारी केली नाही. त्यांनी उमेदवारी का केली नाही असा सवाल उपस्थित करत मर्चंट बँक, एनडीसीसी बँक कुणी बुडविली? असे प्रश्न उपस्थित करत छगन भुजबळ यांनी सडकून टीका केली.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विकास कामांसाठी पैसा मिळाला नाही. मात्र उद्घव ठाकरेंच्या शिवसेनेच्या म्हणवणाऱ्या बंधूंना १०० कोटी कसे मिळाले? असा सवाल उपस्थित करत हे तर ठाकरे गटाचे नाही अशी टीका करत जनता सब जानती है असा टोलाही भुजबळ यांनी लगावला आहे.

शेतकऱ्यांचा महत्वाच्या कांद्याच्या प्रश्नावर पंधरा दिवस आपण सातत्याने आवाज उठविला. तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा आहे मग शेतकऱ्यांचा प्रश्न सभागृहात का नाही मांडला असा सवाल त्यांनी दराडे बंधूंना केला. तसेच आमदारकीला माझ्या विरोधात उभ राहून तुमची इच्छा पूर्ण करून घ्या असा टोलाही त्यांनी दराडे बंधूंना लगावला.

खरंतर छगन भुजबळ यांनी आमदार दराडे बंधु हे एकनाथ शिंदे यांना जावून मिळाले आहे का? असा एक प्रकारे सुर आवळला आहे. इतरांना पैसे मिळत नसतांना यांना पैसे कसे मिळाले असा सवाल एकप्रकारे भुजबळ यांनी उपस्थित करत दराडे बंधूंना आव्हान दिले आहे.