Farmer News : कांद्याच्या भावात मोठी घसरण, संतप्त शेतकऱ्यांनी उचलले मोठे पाऊल

| Updated on: May 21, 2023 | 11:30 AM

Farmer News : शेतकऱ्यांसमोर नेहमी अनेक अडचणी येत असतात. कधी अवकाळी पाऊस पडतो, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ. या संकटांमधून निघाल्यानंतर बाजारात दर मिळत नाही. आता नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक अडचणीत आलाय.

Farmer News : कांद्याच्या भावात मोठी घसरण, संतप्त शेतकऱ्यांनी उचलले मोठे पाऊल
onion farmer
Follow us on

मनोहर शेवाळे, मालेगाव : आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव  (Lasalgaon ) बाजार समितीत कांद्याच्या बाजार भावात घसरण झाली आहे. चांदवड बाजार समितीत कांदे उत्पादन शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च आणि मजुरीही निघत नाही. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी आंदोलन करुन लक्ष वेधले. संपप्त शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला.

शेतकऱ्यांनी केले आंदोलन

चांदवड बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी आक्रमक भूमिका घेत शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गवर रस्ता रोको केला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे ओतून जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे महामार्गांवर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. आंदोलनाची माहिती मिळताच माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

हे सुद्धा वाचा

किती आहे दर

सध्या नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण सुरु असून आज कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 500 ते 600 रुपये इतकाच भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. कांंद्याला दर मिळत नसल्यामुळे उत्पादन खर्च निघणे तर लांब राहिला, काढणीचा खर्चही निघत नाही.

का झाली घसरण

देशांतर्गत ठिकाणी अवकाळी पावसानंतर उन्हाळी कांद्याची आवक राज्यासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल तसेच दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे या राज्यातून लाल आणि उन्हाळी कांद्याची मागणी कमी झाल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण पाहायला मिळत आहे.

सरकारने दखल घ्यावी

अवकाळी पावसामुळे लाल कांद्याचे पीक वाया गेले होते. आतादेखील कांद्याचा बाजारभाव कवडीमोल असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगत कांद्याला हमीभाव मिळावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.