Nida Khan arrest : नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान बद्दल धक्कादायक माहिती समोर, त्या मेडिकल रिपोर्टने मोठी खळबळ

नाशिक येथील टीसीएस कंपनीमधील धर्मांतर आणि लौंगिक शोषण प्रकरणात गेल्या 42 दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला अखरे अटक करण्यात आलं आहे. दरम्यान त्यानंतर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Nida Khan arrest : नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान बद्दल धक्कादायक माहिती समोर, त्या मेडिकल रिपोर्टने मोठी खळबळ
Nida Khan
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 08, 2026 | 3:13 PM

नाशिक येथील टीसीएस कंपनीमधील धर्मांतर आणि लौंगिक शोषणाचं प्रकरण समोर आल्यानं राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील चार आरोपी रजा रफीक मेमन, तौसीफ बिलाल अत्तार, दानिश शेख आणि शाहरुख हुसैन शौकत कुरेशी यांना पोलिसांनी आधीच अटक केली होती. हे सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहेत. परंतु या प्रकरणाची मास्टरमाईंड असलेली निदा खान मात्र फरार झाली होती. ती तब्बल 42 दिवस पोलिसांना गुंगारा देत होती. अखेर तिला आता छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि नाशिक गु्न्हे शाखेच्या पोलिसांकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान निदा खानला अटक केल्यानंतर आता तिच्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

नाशिक येथील टीसीएस कंपनीमधील धर्मांतर आणि लौंगिक शोषण प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या निदा खानबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. निदा खान ही दोन महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची UPT (युरिन प्रेग्नंसी टेस्ट) करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या टेस्टमध्ये निदा खान दोन महिन्यांची गरोदर असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून निदा खानबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे. थोड्याच वेळात पोलीस तिला न्यायालयात हजर करणार आहेत.

दरम्यान हे प्रकरण उघड झाल्यानंतर निदा खानने नाशिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी देखील अर्ज केला होता, परंतु न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आपण गर्भवती आहोत, असं कारण देत तिने पुन्हा एकदा जमिनासाठी प्रयत्न केला होता, मात्र तिला काही अटकपूर्व जामीन मंजूर झाला नाही. अखेर तिला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार निदा खान ही छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती पोलिसांना दोन दिवसांपूर्वीच मिळाली होती, मात्र खबरदारी म्हणून पोलिसांनी दोन दिवस निदा खान ज्या घरात होती, त्या घराची रेकी केली, आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आलं आहे, अशी माहिती समोर येत आहे. तिला नारेगाव परिसरातून अटक करण्यात आलं.

Follow Us