Uday Samant : एका अपक्ष उमेदवारासाठी एवढं सर्व..नाशिकच्या नगरसेवकांवर विश्वास नाही का? उदय सामंत यांचं उत्तर काय?
Uday Samant : "एकनाथ शिंदे यांनी उच्च पदावर त्यांनी बसावं हे माझंही मत आहे. भाजपच्या लोकांचीही इच्छा असते फडणवीस मुख्यमंत्री व्हावे आणि मोठ्या पदावर बसावे. मीही शिवसैनिक आहे. त्यामुळे मलाही वाटतं, एकनाथ शिंदे उच्च पदावर बसावेत" असं उदय सामंत म्हणाले.

नाशिक विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्ह दिसत नाहीयत. नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. पण बंडखोरी करुन गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. हे दोघेही भाजपशी संबंधित आहेत. त्या दोघांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा, यासाठी मागच्या तीन-चार दिवसांपासून उदय सामंत आणि गिरीश महाजन प्रयत्न करत आहेत. पण त्यांना अजूनही यश येत नाहीय. उदय सामंत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. “नाशिकच्या अपक्ष उमेदवारासोबत चर्चा झाली. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा विजय व्हावा म्हणून मी गिरीश महाजन यांना भेटायला आलोय. आशावादी असायला काहीच हरकत नाही. सकारात्मक निर्णय होईल” अशा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. “कुणीही दबाव टाकला नाही. गणेश गीते जवळचे मित्र आहेत. गोकूळ गीते हे मित्र आहेत. विनंती हा दबाव होत नाही. मी संयमी आहे. संयमाने बोलतो. गीते भाजपला मानतात, म्हणून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. दबाव टाकायचं असतं तर चार चार वेळा मिटिंगला आलो नसतो. दबाव कसा टाकायचं मला माहीत आहे. त्याचं ज्ञान आहे” असं उदय सामंत म्हणाले.
“मी आणि गिरीश महाजन हे सुद्धा संयमाने बोलत आहेत. गीतेंना आमदार व्हायचं आहे. इच्छा असणं चुकीचं नाही. एखाद्याशी चर्चा करणं हा काही ३०२ चा गुन्हा नाही. आमच्याकडून कोणताही दबाव नाही” असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. “नगरसेवकांवर विश्वास नाही असं नाही. ते भाजपमध्ये काम करत आहेत. एखादा कार्यकर्ता दुखावला असेल तर तो दुरावू नये असं वाटतं. गणेश गीते यांनी चांगलं काम केलं आहे. त्यांनी अनेक निवडणुकीत भाग घेतला आहे. त्यांनी अर्ज भरला. पण आमच्याकडे मेजॉरिटी आहे, म्हणून दुर्लक्ष करणं योग्य नाही. गोकूळ गीते मला आणि गिरीश भाऊंना परके नाहीत. राज्यात ११ निवडणुका सुरू आहेत. त्यात याच निवडणुकीवर चर्चा होते. ही निवडणूक किती मोठी झाली आहे हे दिसून येते. निकालाच्या आधी ही निवडणूक गाजतेय याचं समाधान आहे. पण संयम आणि समन्वयाने सर्व गोष्टी सुटाव्या” अशी अपेक्षा उदय सामंत यांनी व्यक्त केली.
तेच आम्ही जळगावात करणार
“शिंदे साहेबांनी मला ज्या ज्या ठिकाणची जबाबदारी दिली. त्यावर माझं लक्ष आहे. सोलापूर, सांगली-साताऱ्यात बंडखोरी झाली. तिथे बंडखोरी मागे घेतली. छत्रपती संभाजी नगरमध्ये सत्तार यांच्या मुलाने अर्ज भरला. त्यांनीही अर्ज मागे घेतला. सुनेत्रा पवार या अर्ज भरण्यासाठी अर्धा तास बाकी असताना शिंदेंशी बोलल्या. पाचव्या मिनिटाला आम्ही अर्ज मागे घेतला. तेच आम्ही जळगावात करणार आहोत” असं उदय सामंत म्हणाले.
कुणाचा अर्ज मागे घेणार नाही
“दबाव तंत्र नाही. आम्ही गोकूळजींची वाट पाहत होतो. रेश्मा काळे या नाशिकमध्ये होत्या. त्यांची वाट बघत होतो. त्यांचे फॉर्म टिकले आहेत. महायुतीला दगाफटका होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कुणाचा अर्ज मागे घेणार नाही. फक्त त्यांचा पाठिंबा घेणार” असं उदय सामंत म्हणाले.
बच्चू कडूंचा काही गैरसमज झाला
“बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी मागणी केली आहे. त्यांनीच आंदोलन केलं होतं. कर्जमाफीसाठी. त्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठक झाली होती. सानुग्रह अनुदानाचा विषय होता की नव्हता. पण ५० हजारापर्यंत सानुग्रह अनुदान दिलं. ५० हजारांची कर्जमाफी दिली. बच्चू कडूंचा काही गैरसमज झाला आहे. त्यांच्याशीच मी बोलत होतो. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे कर्जमाफी झाली आहे” असं उदय सामंत म्हणाले.