तटकरेंना व्हिलन का केलं जातंय? वडिलांसाठी मुलगी धावली; आदिती तटकरेंची पहिली प्रतिक्रिया काय?
राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चेत सुनील तटकरे यांना व्हिलन ठरवले जात असल्याबद्दल त्यांची कन्या आदिती तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वडिलांना व्हिलन का केले जात आहे, असा सवाल करत, अजितदादा आणि सुनील तटकरे यांची मैत्री जुनी असून तटकरे त्यांचे कर्तव्य निभावत असल्याचे त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला हवा दिली आहे. त्यामुळे सुनील तटकरेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले आहेत. शरद पवार गटाच्या नेत्यांनी तटकरे यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे. जेव्हा आम्ही विलिनीकरणावर बोलत होतो, तेव्हा तटकरे हेच विरोध करत होते. अजितदादांनी अशी कोणतीच चर्चा केली नसल्याचं सांगत होते. मग आज विलिनीकरणावर का बोलत आहेत? असा सवाल शरद पवार गटातून होत आहे. त्यामुळे या प्रकरणात तटकरे व्हिलन झाल्यासारखं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर वडिलांसाठी मुलगी धावून आली आहे. सुनील तटकरे यांच्या कन्या आणि राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे यांना व्हिलन का केलं जात आहे? असा सवालच त्यांनी केला आहे.
आदिती तटकरे या नंदुरबार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या प्रकरणात सुनील तटकरे यांना व्हिलन ठरवलं जात आहे, असं त्याना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी ही दुर्देवी गोष्ट असल्याचं म्हटलं. या मुद्द्यावर मी मुलगी म्हणून बोलेल. त्यांना व्हिलन ठरवलं जात आहे. याचं दुर्देव वाटतं. अजितदादा आणि सुनील तटकरे यांना मी अनेक वर्षापासून एकत्र पाहिलं आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या आधीपासूनची त्यांची मैत्री होती. काँग्रेसमध्ये असल्यापासून दोघेही मित्र आहेत. अनेक प्रसंगाना दोघेही एकत्रितपणे सामोरे गेले आहेत. पण त्यांच्या मैत्रीत दुरावा आला नाही. आता दादा नाहीत. पण मित्र म्हणून तटकरे त्यांचं कर्तव्य ते पार पडत राहतील. टीका होत राहते. प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि मित्र म्हणून ते जबाबदारी पार पाडत आहेत, असं आदिती तटकरे म्हणाल्या.
मला फोन आला नाही
सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून विलिनीकरणासाठी आमदारांना फोन जात आहेत. तुम्हाला फोन आला का? असं विचारलं असता त्यांनी नाही म्हणून सांगितलं. मला फोन आलेला नाही. बऱ्याचशा शंका-कुशंका सुरू आहेत. बातम्या सुरू आहेत. पण आम्ही सुनेत्रा काकींच्या नेतृत्त्वात काम करत आहोत. सध्या राजकीय हालचालींपेक्षा मी ज्या विभागाची मंत्री आहे, त्या विभागाकडे अधिक लक्ष केंद्रित करत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मी छोटी कार्यकर्ती, जे ठरवायचं ते…
यावेळी त्यांनी विलिनीकरणावर थेट भाष्य करणं टाळलं. मी छोटी कार्यकर्ती आहे. शरद पवार साहेब, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे याबाबत निर्णय घेतील. आम्ही सुनेत्रा काकींच्या नेतृत्वात काम करत आहोत. त्या ज्या भूमिका घेतील, त्या कार्यकर्ते म्हणून मान्य असेल, असं त्यांनी स्पोष्ट केलं.
जबाबदारी एका बाजूनेच नव्हे…
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. अशी टीका निंदणीय आहे. निषेधार्ह आहे. तिन्ही नेत्यांच्या नेतृत्त्वात महायुतीचं सरकार जनतेसाठी काम करत आहे. राज्याला पुढे नेत आहे. महायुतीचे सर्व घटक पक्ष म्हणून एकत्र काम केलं पाहिजे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून महायुतीत मिठाचा खडा टाकू नये. जबाबदारी एका बाजूने पार पाडली जात नाही, दोन्ही बाजूने पार पाडली जाते. हे सर्व सीनिअर नेते आहेत. जबाबदारी पडतील. एकमेकांवर मित्र पक्षांनी टीका टाळली तर चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं.