
बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मोर्चात मंत्री छगन भुजबळ यांनी अपेक्षेप्रमाणे घणाघाती भाषण केले. त्यांच्या भाषणात तीच धार आणि तोच जोष दिसला. कालच्या मोर्चात त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला. तर आज टीव्ही 9 मराठी बोलताना त्यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला. 2 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासकीय परिपत्रकाविरुद्ध त्यांनी शड्डू ठोकले आहेत. त्यांच्या नवीन वक्तव्यामुळे सरकारच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
प्रशासन दबावात असल्याचा आरोप
छगन भुजबळ यांनी प्रशासन दबावात असल्याचा गंभीर आरोप केला. 2 सप्टेंबर 2025 रोजीच्या जीआरमुळे आता मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची जणू सूटच मिळाल्याचे भासवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जो आला त्याला द्या कुणबी प्रमाणपत्र असे सध्या चित्र असल्याचे ते म्हणाले. भुजबळांच्या या आरोपांमुळे अप्रत्यक्षरित्या सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकार दरबारी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कुणाचा दबावा आहे, हे मात्र समोर आले नाही. मात्र प्रशासकीय अधिकारी दबावात असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला आहे.
काय म्हणाले भुजबळ?
मागील 15-16-17 वर्षांतील गोष्टी पडताळून पाहायच्या आहेत. पण जो येईल, त्याला प्रमाणपत्र देण्यात येत आहे. हा काय प्रकार आहे. हे 2 सप्टेंबर 2025 रोजीच्या जीआरमुळे हे सर्व घडत आहे. जो येईल त्याला द्यायला काहीच हरकत नाही. कोणी येतो आणि सांगतो हा कुणबी आहे, हा माझा नातेवाईक आहे, कुणबी प्रमाणपत्र देऊन टाका, हे असं कसं चालेल असा प्रश्न भुजबळांनी विचारला. आदिवासी, दलित आणि ओबीसी समाजाला मात्र 60 वर्षांपूर्वीचे प्रमाणपत्र मागण्यात येते. त्यांना जातीचा जुना दाखला विचारण्यात येतो. येथे तर अवघ्या 10 तासात कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचा आरोप भुजबळांनी केला. प्रशासनातील अधिकारी दबावात आहेत. 2 सप्टेंबर 2025 रोजीचा जो जीआर आला आहे, त्यामुळे असे वाटत आहे. त्यांना वाटत आहे की फ्री फॉल ऑल झालंय, असे भुजबळ म्हणाले. यावेळी त्यांनी वडेट्टीवार आणि जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा टीका केली. त्यांनी वडेट्टीवार यांनी सुरुवातीला पाठिंबा दिल्याचे सांगत पुढे त्यांच्या बदलेल्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ओबीसी नेत्यात पुन्हा दुफळी दिसून आली. ओबीसी खेम्यात छगन भुजबळ, बबनराव तायवाडे आणि विजय वडेट्टीवार असे तीन गट दिसून येत आहे. कालच्या सभेत लक्ष्मण हाकेंनी भुजबळ हे ओबीसी नेते असून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.