नाशिक, पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यूचे थैमान, 15 दिवसात 200 जणांना लागण

आरोग्य विभागाकडून शहरातील विविध भागाची सातत्याने तपासणी केली जात आहे. तसेच वाढत्या रुग्ण संखेमुळे महापालिकेच्या आरोग्या विभागाची चिंता वाढली आहे.

नाशिक, पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यूचे थैमान, 15 दिवसात 200 जणांना लागण
dengue mosquito
| Updated on: Jul 16, 2024 | 11:05 AM

Maharashtra Dengue Cases : सध्या महाराष्ट्रात विविध साथीच्या आजारांनी थैमान घातलं आहे. नाशिकसह पिंपरी चिंचवड परिसरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिकमध्ये गेल्या 15 दिवसात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २०० पार गेली आहे. तर पिंपरी चिंचवड परिसरात आतापर्यंत 17 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून शहरातील विविध भागाची सातत्याने तपासणी केली जात आहे. तसेच वाढत्या रुग्ण संखेमुळे महापालिकेच्या आरोग्या विभागाची चिंता वाढली आहे.

नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 200 पार

नाशिक शहरात डेंग्यूने अक्षरश: कहर केला आहे. गेल्या १५ दिवसांत शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २०० पार गेली आहे. नाशिकमध्ये जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ९६ रुग्ण आढळले होते. त्यानतंर दुसऱ्या आठवड्यात १०४ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. नाशिक शहरातील सिडको विभागात डेंग्यूचे सर्वाधिक २७ रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ नाशिकरोड विभागात २२, नाशिक पूर्व आणि पंचवटी विभागात प्रत्येकी १६, नाशिक पश्चिममध्ये ११ तर सातपूर विभागात डेंग्यूच्या १० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाची चिंता वाढली

नाशिकमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनासह नागरिकही चिंतेत आहेत. डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाकडून शहरातील विविध भागात सातत्याने तपासणी आणि शोध मोहिम केली जात आहे.

तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत डेंग्यूचे 17 रुग्ण आढळले आहेत. त्यात 07 पुरुष आणि 10 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरातील 2775 संशयित रुग्णाचे नमुने तपासण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणेमध्ये चिंता पसरली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यू रुग्णाच्या संख्येत वाढ

सध्या पिंपरी चिंचवड शहरातील संशयित डेंग्यू रुग्णाची संख्या वाढत चालली आहे. महापालिकेकडून डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

दरम्यान सध्या महाराष्ट्रात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून घरे आस्थापनाची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीदरम्यान तब्बल दीड हजार जणांना महापालिकेकडून नोटीस देण्यात आली आहे. तसेच त्यांना 5 लाख 61 हजार रुपयांचा दंड महापालिकेकडून ठोठावण्यात आला आहे.

5 लाख 61 हजारांचा दंड वसूल

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांकडून तब्बल 1 लाख 80 हजार घरांची तर 8 लाख 23 हजार कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 896 घरे आणि 3 हजार 180 कंटेनर अशा एकूण 6 हजार 76 ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल 5 लाख 61 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर 1 हजार 440 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.