Nashik News : भूकंप, जमावबंदी नाशिकमधील पाच महत्वाच्या बातम्या

Nashik News : महाराष्ट्राच्या प्रगती, विकासामध्ये नाशिक जिल्ह्याची महत्वाची भूमिका आहे. मागच्या काही महिन्यांपासून राजकीय आणि गुन्हेगारी कारणांमुळे नाशिक जिल्हा चर्चेत आहे. भोंदूबाबा अशोक खरातमुळे नाशिक जिल्हा चांगलाच चर्चेत आला. आजच्या नाशिकमधील पाच महत्वाच्या बातम्या जाणून घ्या.

Nashik News : भूकंप, जमावबंदी नाशिकमधील पाच महत्वाच्या बातम्या
Earthquake
| Updated on: Jul 29, 2026 | 8:56 AM

नाशिक जिल्ह्यात भूकंपांच्या धक्क्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आहे. दिंडोरी, सुरगाणा आणि पेठ परिसर 24 तासात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने पायाभूत सुविधांची सुरक्षितता तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धरणं , पूल, शासकीय इमारती , शाळा , वस्तीगृह तपासून आवश्यक तातडीच्या उपायोजना करण्याच्या जिल्हा प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. दिंडोरी पेठ सुरगाणा कळवण आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यात विशेषता क्षत्रीय अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भूकंपाचे धक्के बसलेल्या परिसरात पाहणी केल्यानंतर अहवाल आपत्ती व्यवस्थापन विभागाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

15 जुलै रोजी कार्यान्वित झालेल्या पोर्टलवर 124 ऑनलाईन तक्रारींची नोंद झाली आहे. नाशिक विभागात नागरिकांनी केलेल्या ऑनलाईन तक्रारीनंतर तक्रारींची तपासणी करून आवश्यक ती कारवाई केली. अस्वच्छ उत्पादन, अन्नपदार्थांमध्ये बाह्य घटक आढळणे, निकृष्ट दर्जाचे पॅकेजिंग अन्न, मुदत बाह्य अन्य पदार्थ, भेसळ युक्त दुग्धजन्य पदार्थ, गुटखा विक्री यासारख्या संबंधित तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. नागरिकांना ऑनलाइन पोर्टलवर तक्रार नोंदवण्यास अडचण असल्यास टोल फ्री क्रमांक देखील उपलब्ध आहे.

शस्त्र व जमावबंदी आदेश

नाशिक शहर कार्यक्षेत्रात 11 ऑगस्टपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. नाशिक शहर कार्यक्षेत्रात 28 जुलै 2026 रोजी मध्यरात्रीपासून ते 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, आठवडी बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास आणि रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नसणार. शस्त्र व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिकमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा कुठे?

भर पावसाळ्यातही नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. येवला, नांदगाव, बागलाण, मालेगाव, चांदवड देवळा सह सिन्नर तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा. सर्वाधिक 29 टँकरद्वारे येवला तालुक्यात पाणीपुरवठा तर नांदगाव मध्ये 26 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी येवला तालुक्यात चार तर नांदगाव मध्ये नऊ आणि मालेगाव मध्ये 16 विहिरींचे अधिग्रहण केले आहे. येवला तालुक्यातील टँकरद्वारे 55 फेऱ्या तर नांदगाव मध्ये 63 आणि मालेगाव मध्ये 33 टँकरच्या फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा.

पाण्याचा विसर्ग वाढवला

नाशिकच्या गंगापूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवला. गंगापूर धरणातून सध्या 8,160 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विसर्गात वाढ. नाशिक जिल्ह्यातील 14 ते 15 धरणांतून आजही पाण्याचा विसर्ग कायम. दारणा धरणातून 2,636 क्युसेक, तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीकडे 25,925 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. विसर्ग सुरू असला तरी गोदावरी आणि दारणा नदीची पाणीपातळी सध्या नियंत्रणात. नाशिक शहर व परिसरात आजही संपूर्ण ढगाळ वातावरण. पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us