हलक्या सरींनी नाशिक चिंब; तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

| Updated on: Oct 02, 2021 | 12:21 PM

नाशिकमध्ये शनिवारी रिमझिम सरींसोबत ढगाळ वातावरण आहे. आज आणि उद्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हलक्या सरींनी नाशिक चिंब; तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये शनिवारी रिमझिम सरींसोबत ढगाळ वातावरण आहे. आज आणि उद्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गोदावरीला चार पूर आले. गंगापूर धरण समूह भरला. जिल्ह्यातील बहुतांश धरण भरत आले आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणारे अप्पर वैतरणा भरले आहे. त्यानंतरही पावसाची सतत हजेरी सुरू आहे. राज्यात पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्राच्या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरापासून तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. आज सकाळपासून शहरावर ढगांची दाटी आहे. मधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी गडगडाटी वादळासह आज आणि उद्या पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, हवामान विभागाने परतीच्या पावसाचा अंदाजदेखील व्यक्त केला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास 06 ऑक्टोबरला सुरु होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाचे दिल्ली येथील तज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी ट्वीट करून याविषयी माहिती दिली. मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारताच्या काही भागांतून सुरु होईल.

मराठवाड्यात कुठे अलर्ट?

2 ऑक्टोबर- या दिवशी परभणी, बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात ढगांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
3 ऑक्टोबर- या दिवशी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर
4 ऑक्टोबर – औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान सल्ला पत्रकात वर्तवण्यात आली आहे.

आतापर्यंत 15521.7 मिमी बरसला

नाशिक जिल्ह्यातल्या पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ही 15004.69 मिमी आहे. त्यात बुधवारी झालेल्या नोंदीनुसार ही सरासरी आता 15521.7 मिमीवर पोहचलीय. गुलाबी चक्रीवादळानं जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळं अनेक ठिकाणी घरे कोसळली. शेतीचं मोठं नुकसान झालं. सध्या पावसानं पाठ फिरवली तरी हरकत नाही. कारण उरलं-सुरलं खरीप तर पदरात पडेल, अशी आशा शेतकरी करतोय.

इतर बातम्याः

नाशिकमध्ये सोमवारपासून घुमणार प्रार्थनेचे सूर; जिल्ह्यात एकूण 3029 शाळांचा होणार श्रीगणेशा

भुजबळांच्या नावे पुन्हा खणखणले धमकीचे फोन; जिल्हाधिकाऱ्यांच्याही नावाचा वापर

(Light showers in Nashik, chance of rain in sparse places)