डीजेमुळे थेट मंत्र्यालाच बहिरेपण; गुलाबराव पाटील म्हणाले, मला 40 टक्के…
महाराष्ट्रात डीजेवर बंदी घालण्याची जोरदार मागणी होत आहे, अनेक मंत्र्यांनी डीजेमुळे झालेल्या आरोग्याच्या गंभीर परिणामांचे अनुभव सांगितले आहेत, ज्यात ऐकण्याची शक्ती कमी होणे आणि जीवघेणा धोकाही समाविष्ट आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना डीजेच्या आवाजाचा आणि प्रकाशाचा प्रचंड त्रास होतो.

राज्यभरात डीजेवर बंदी घालण्याची जोरदार मागणी होत आहे. अनेक जिल्ह्यांनी डीजे बंदी केली आहे. मात्र, पुण्यासारख्या शहरात डीजे बंदीचा घोळ अद्याप कायम आहे. या डीजेमुळे कुणा कुणाला काय काय अनुभव आलाय याचे किस्सेही समोर येत आहेत. राज्याच्या मंत्री मेघना बोर्डिकर यांनी त्यांच्या सख्ख्या चुलत भावाचा डीजेमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं. तर सरकारमधील दुसरे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही डीजेमुळे त्यांना 40 टक्के ऐकू कमी येत असल्याचं सांगितलंय. गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात संवाद साधताना आपबिती सांगितली आहे.
माझ्या पुतण्याचं लग्न होतं. डीजे लावण्यात आलेला होता. मला लोकांनी सांगितलं तुम्ही नाचा आणि मला नाचण्यासाठी ओढलं. त्यामुळे पुतण्याच्या लग्नात नाचलो. पण सप दिशी डीजेचा आवाज माझ्या कानावर आदळला. या डीजेच्या आवाजामुळे मला एका कानाने चाळीस टक्के ऐकू येणे बंद झाले. काहींनी मला कानाला मशीन लावायला सांगितलं. पण बहिरं वाटतं म्हणून मी मशाीन लावली नाही. त्यामुळे येत्या गणेशोत्सात तरुणांनी डीजे नाही लावला तर चांगलं होईल, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. पाटील यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
आजारी व्यक्तींना त्रास होतो
डीजेमुळे लहान मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. आजारी व्यक्तींना त्याचा त्रास होतो. लहान मुलांना त्रास होतो. शुगर, बीपी असणाऱ्यांना त्याचा त्रास होतो. लेन्सचा प्रखर प्रकाश डोळ्यावर आल्याने त्याचा डोळ्यावरही परिणाम होतो. त्यामुळे त्या गणेशोत्सवात तरुणांनी डीजे लावला नाही तर चांगले होईल, असे देखील गुलाबराव पाटील म्हणाले. पोळा सणानिमित्ताने गुलाबराव पाटील यांच्या वतीने शेतकऱ्यांना बैलांचा साज आणि साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
धोरणात्मक निर्णय नाही
दरम्यान, नागपूरसह अनेक जिल्ह्यात डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात काही जिल्ह्यांमध्ये डीजे वापरता येणार नाही. मात्र, पुण्यात अजूनही डीजेचा प्रश्न कायम आहे. डीजेवर बंदी घालण्यासाठी विद्यानंद बापट यांच्यासह असंख्य पुणेकर आंदोलन करत आहेत. सरकारनेही पुणेकरांनी पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, डीजे बंदीवर सरकारकडून अद्याप कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाहीये.