Sanjay Raut | ‘संजय राऊत हाजिर हो!’, मालेगाव कोर्टाचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मालेगाव कोर्टाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. मालेगाव कोर्टाने त्यांना कोर्टात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता राऊत खरंच सुनावणीसाठी कोर्टात हजर राहतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Sanjay Raut | संजय राऊत हाजिर हो!, मालेगाव कोर्टाचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
| Updated on: Oct 07, 2023 | 10:49 PM

मनोहर शेवाळे, Tv9 मराठी, मालेगाव | 7 ऑक्टोबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मालेगाव न्यायालयाकडून सुनावणीवेळी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना मुंबईहून मालेगावच्या न्यायालयात हजार राहण्यासाठी जावं लागण्याची शक्यता आहे. अर्थात संजय राऊत न्यायालयात हजर राहतात का? ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण न्यायालयाने राऊतांना 23 ऑक्टोबरच्या सुनावणीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणी संजय राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मालेगाव येथील गिरणा साखर कारखान्यात जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अपहार केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. याप्रकरणी मालेगाव न्यायालयात पालकमंत्री भुसे यांनी मानहानीची तक्रार दाखल केली आहे. यासाठी न्यायालयाकडून खासदार राऊत यांना 23 ऑक्टोबरला खुलासा सादर करण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

गिरणा साखर कारखाना वाचविण्यासाठी नवीन स्थापन केलेल्या कंपनीत अपहार झाल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला होता. यासंदर्भात राऊत यांना पालकमंत्री भुसे यांनी मालेगाव येथील कंपनीच्या सर्वसाधारण सभेत येऊन अपहार झाल्याचे सिद्ध करण्यासाठी उपस्थित राहावे, असे जाहीर आमंत्रण दिले होते. पण खासदार राऊत बैठकीला न राहिल्याने भुसे यांची बदनामी केल्याचा ठपका ठेवत मालेगाव न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी 23 ऑक्टोबरला न्यायालयात सुनावणी होणार आहे.