Nashik Accident : नाशिकमध्ये भरधाव कार थेट बंगल्यात शिरली; 5 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी

Nashik Car Accident : नाशिक कळवण महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. भरधाव कार थेट बंगल्यात घुसली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. कोल्हापूर फाट्यावर हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला.

Nashik Accident : नाशिकमध्ये भरधाव कार थेट बंगल्यात शिरली; 5 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी
नाशिक कळवण अपघात
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 05, 2025 | 12:37 PM

नाशिक-कळवण महामार्गावर कार थेट बंगल्यात घुसली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन जखमी झाले आहेत. कोल्हापूर फाट्यावर हा भीषण अपघात घडला. भदाण कुटुंबियांवर काळाने घाला घातला. नाशिकमध्ये एका लग्नसमारंभानंतर हे कुटुंब परत होते. बुधवारी रात्री 10 वाजता हा कार अपघात झाला. या अपघातात नामपूर आणि देवळा येथील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू ओढावला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

चालकाचा वाहनावरील ताबा सुटला

नामपूर येथील भदाण कुटुंबियांच्या नातेवाईकाचे नाशिकमध्ये लग्न होते. त्यासाठी भदाण आणि मेतकर कुटुंबिय नाशिकला आले होते. लग्नानंतर हे सर्व जण कारमधून सटाण्याकडे निघाले होते. नाशिक-कळवण महामार्गावर कोल्हापूर फाटा आला तेव्हा चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्याने कार थेट विठोबा शंकर अहेर यांच्या बंगल्यात घुसवली. ही कार बंगल्यात जाऊन आदळली. बंगल्याबाहेरील असलेला सिमेंट खांब वाकून कार आत घुसली. त्यावरून हा अपघात किती भीषण होता हे समोर येते.

भदाण, मेतकर कुटुंबावर शोककळा

या भीषण अपघातात चालकासह भदाण, मेतकर कुटुंबातील पाच जण ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. या अपघातात चालक खालिक मेहमूद पठाण (50) रा. नामपूर, ता. सटाणा तसेच माधवी मेतकर (32) आणि त्यांची मुलगी त्रिवेणी मेतकर (04) रा. देवळा, शैला वसंत भदाण (62) आणि त्यांची जाऊ सरला भालचंद्र भदाण (50) हे जागीच ठार झाले. तर उत्कर्ष मेतकर (12) रा. देवळा आणि
भालचंद्र भदाण (52) रा. नामपूर हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सुरुवातीला कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे भदाण आणि मेतकर कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. अपघात घडताच आजूबाजूच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमधील अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.