लॉरेन्स बिश्नोई ग्रुप से बोल रहा हूँ… नाशिकमधील व्यावसायिकाला धमकी, मागितली दोन कोटींची खंडणी

नाशिकमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ‘लॉरेन्स बिश्नोई गँग’च्या नावाने दोन कोटींच्या खंडणीची धमकी देण्यात आली आहे.

लॉरेन्स बिश्नोई ग्रुप से बोल रहा हूँ... नाशिकमधील व्यावसायिकाला धमकी, मागितली दोन कोटींची खंडणी
Nashik Road
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 23, 2026 | 10:10 AM

नाशिक शहरातील एका स्पोर्ट्स साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला ‘लॉरेन्स बिश्नोई गँग’च्या नावाने दोन कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून सध्या सखोल तपास सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?

तक्रारीनुसार, व्यावसायिकाला मोबाईलवर मेसेजद्वारे धमकी देण्यात आली. मेसेजमध्ये ‘लॉरेन्स बिश्नोई ग्रुप से शुभम लोणकर बोल रहा हूँ…’ असे सांगत दोन कोटी रुपये न दिल्यास तीन भावांपैकी एकाला मारण्याची खुली धमकी देण्यात आली होती. या धमकीमुळे व्यावसायिकाने तात्काळ पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी ही तक्रार गंभीर मानून शुभम लोणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांचा तपास सुरु

मात्र, नेमकी धमकी कोणी दिली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सांगितले की, लॉरेन्स बिश्नोई टोळीतील शुभम लोणकर याने स्वतः कॉल किंवा मेसेज केला आहे का, की इतर कोणी त्यांच्या नावाने मेसेज पाठवला आहे, याचा उलगडा तपासातूनच होणार आहे. यासंदर्भात तांत्रिक विश्लेषणासह गोपनीय विभागांचीही मदत घेतली जात आहे. मोबाईल नंबर, आयपी अॅड्रेस आणि मेसेजचा स्रोत शोधण्यासाठी विशेष पथके कामाला लागली आहेत.

पोलिसांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या खोट्या किंवा खऱ्या धमक्यांमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन जलदगतीने तपास सुरू ठेवण्यात आला आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अधिक माहिती जमा करण्यासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व्यावसायिक आणि त्याच्या कुटुंबियांची चौकशी केली आहे.

शहरातील व्यावसायिकांना अशा धमक्यांबाबत सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणतीही धमकी आल्यास तात्काळ पोलिसांकडे संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. तपासाच्या पुढील टप्प्यात आरोपींना अटक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. प्रकरणातील नेमके सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us