Nashik fire | महाराष्ट्राचे भरतपूर धोक्यात; नांदूर मधमेश्वर अभरयारण्यात अग्नीकल्लोळ, हजारो पाखरांचा जीव टांगणीला

| Updated on: Apr 05, 2022 | 12:59 PM

नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर मधमेश्वर अभयारण्यात पक्षी निरीक्षकांच्या नोंदीनुसार सुमारे 240 पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी आढळतात. मात्र, सध्या या परिसरात आगीचे तांडव सुरू झाले आहे. त्यामुळे यातील हजारो पक्ष्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.

Nashik fire | महाराष्ट्राचे भरतपूर धोक्यात; नांदूर मधमेश्वर अभरयारण्यात अग्नीकल्लोळ, हजारो पाखरांचा जीव टांगणीला
नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर मधमेश्वर अभयारण्यात आगीचे तांडव सुरू आहे.
Follow us on

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात वसलेल्या नांदूर मधमेश्वर अभयारण्यात (Nandur Madhameshwar sanctuary) लागलेल्या आगीमुळे (Fire) हजारो पाखरांचा जीव धोक्यात आला आहे. सोमवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही आग लागल्याचे समजते. परिसरात आगीने रौद्ररूप धारण केले आहे. अभयारण्यातील अधिकारी खासगी क्षेत्रात आग लागल्याचे म्हणत आहेत. मात्र, पंचक्रोशी गावकऱ्यांनी ही आग अभयारण्यात लागल्याचे म्हटले आहे. या आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. चापडगाव आणि मांजरगावच्या शिवारात ही आग लागल्याचे समजते. पक्षीनिरीक्षण केंद्रापासून सुमारे साडेतीन ते चार किलोमीटरवर ही आग आहे. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवता आले नव्हते. दरम्यान, आज मंगळवारी सकाळी काही कर्मचारी ही आग नेमकी कुठे लागली आहे, ते पाहायला गेल्याचे वृत्त आहे. ही आग वाढली तर अभयारण्यातील हजारो पक्षांना याचा धोका होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.

कशी झाली निर्मिती?

नाशिक जिल्ह्यात 1986 मध्ये नांदूर मधमेश्वर अभयारण्य आकारास आले. 1999 मध्ये गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावर बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यातील पाणी दोन्ही बाजूंच्या कालव्यांद्वारे सोडण्यात येऊ लागले. त्यामुळे गाळ, दलदल, गाळ साठून नदीपात्रात उंचवटे अशी भूरूपे तयार झाली. येथे पक्ष्यांना खाद्य म्हणून आवश्यक असलेले मासे, शैवाल, दलदलीतील कीटक मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे आपसुकच पक्ष्यांची संख्या वाढत गेली.

पक्षी तज्ज्ञांचे प्रयत्न

पक्ष्यांच्या स्थलांतराच्या काळात येथे सुमारे 35000 पक्षी आढळत असल्याची नोंद आहे. ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ डॉ. सालीम अली यांनी 1982 मध्ये नांदूर मधमेश्वरला भेट दिली. हे ठिकाण पाहून ते मंत्रमुग्ध झाले. ‘हे तर महाराष्ट्राचे भरतपूर आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. डॉ. सालीम अली यांनीच हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्याची विनंती सरकारला केली. त्यानंतर पुढे 1986 मध्ये हा परिसर नांदूर मधमेश्वर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला.

जांभळी पाणकोंबडी राणी

नांदूर मधमेश्वर अभयारण्यात अपार पक्षीसंपदा आहे. या ठिकाणी मुग्धबलाक (ओपन बिल्ड स्टॉर्क), चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क), पाणकावळा, काळे कुदळे, खंडया, गाय बगळे, जांभळी पाणकोंबडी, राखी बगळा, पर्पल हेरॉन, युरेशियन कूट, हळद कुंकू बदक हे स्थानिक पाणपक्षी आढळतात. जलाशयाच्या परिसरात जांभळी पाणकोंबडी मोठ्या प्रमाणावर आढळते. त्यामुळे तिला नांदूर मध्यमेश्वरची राणी म्हटले जाते.

240 प्रजाती धोक्यात

अभयारण्यात टिल, पोचार्ड, विजन, गडवाल, थापट्या, पिनटेल, गारगनी, कॉटन पिग्मी गूज ही विविध प्रकारची बदके हिवाळ्यात स्थलांतर करून येतात. सोबतच गॉडविट, सॅंड पायपर (तुतवार), क्रेक, रफ, स्मॉल प्रॅटीनकोल हे दलदलीत आढळणारे स्थलांतरीत पक्षीसुद्धा येतात. नांदूर मधमेश्वरमध्ये दरवर्षी पक्षीमित्र संघटना आणि बी.एन.एच.एस. यांच्या वतीने पक्षीगणना केली जाते. पक्षी निरीक्षकांच्या नोंदीनुसार येथे सुमारे 240 पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी आढळतात. आगीचे तांडव सुरू झाले, तर यातील हजारो पक्ष्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?