Lalit Patil : ना सरकारी व्हॅन, ना स्थानिक पोलिसांना खबर, ललित पाटील याला घेऊन पोलीस गुप्तपणे नाशिकमध्ये; कारण काय?

ड्रग्स माफिया ललित पाटील यांच्या पोलिसांनी चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत. चार दिवसांपूर्वी त्याला अटक केल्यानंतर मुंबई पोलीस त्याला गुप्तपणे नाशिकमध्ये घेऊन आले. पोलीस अचानक नाशिकमध्ये आले होते.

Lalit Patil : ना सरकारी व्हॅन, ना स्थानिक पोलिसांना खबर, ललित पाटील याला घेऊन पोलीस गुप्तपणे नाशिकमध्ये; कारण काय?
Lalit Patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 22, 2023 | 9:26 AM

चंदन पुजाधिकारी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 22 ऑक्टोबर 2023 : ड्रग्स माफिया ललित पाटील याला चार दिवसांपूर्वी बंगळुरूमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. त्याला सोमवारपर्यंत कोठडी सुनावण्यात आल्यानंतर पोलिसांनी गेल्या चार दिवसांपासून त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. उद्या ललित पाटील याची कोठडी संपत आहे. त्यापूर्वीच पोलीस त्याला आज अचानक नाशिकमध्ये घेऊन आले. यावेळी कुणालाच खबर देण्यात आली नाही. पोलीस अचानक ललित पाटीलला घेऊन आले आणि त्याची कसून चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे.

आज सकाळी सकाळीच मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला घेऊन नाशिक गाठलं. त्याला नाशिकच्या शिंदे पळसे गावात घेऊन आले. यावेळी पोलीस साध्या ड्रेसमध्ये होते. विशेष म्हणजे पोलीस व्हॅनमधून पोलीस आले नव्हते. पोलीस साध्या कारमध्ये ललितला घेऊन आले. तसेच येणार असल्याचं पोलिसांनी नाशिक पोलिसांनाही सांगितलं नाही. थेट गुप्तपणे शिंदे पळसे गाव गाठलं.

ज्या शिंदे पळसे गावात ललित पाटील एमडी ड्रग्स तयार करायचा तिथल्या कारखान्यावर त्याला आणण्यात आलं आहे. त्याला बुरखा घालण्यात आला होता. त्याला थेट कारखान्यात नेण्यात आलं. यावेळी त्याने पोलिसांना कारखान्याची माहिती दिल्याचं सांगितलं जातं. ड्रग्स कसे बनवायचे? किती लोकं असायचे? त्याचं वितरण कसे व्हायचे? आदी माहिती मिळवण्यासाठी पोलीस त्याला घेऊन आले होते. त्याने ही माहिती दिल्याचं सांगितलं जात आहे.

नाशिककडे रवाना

तब्बल 15 ते 20 मिनिटे पोलीस या कारखान्यात होते. त्यानंतर पोलीस त्याला घेऊन नाशिककडे रवाना झाले. नाशिकच्या उपनगरात ललितचं घर आहे. त्याच्या घरी त्याला पोलीस घेऊन जाणार असल्याची चर्चा होती. पण पोलीस नाशिक उपनगरात गेली. पण त्याच्या घरी पोलीस गेले नाहीत. नाशिकमध्ये त्याच्या ज्या ठिकाणी मालमत्ता होत्या, त्या ठिकाणी पोलीस त्याला घेऊन जाणार असल्याचीही चर्चा होती. पण पोलीस थेट मुंबई-आग्रा महामार्गावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

सराफांची नावे

ललितने ड्रग्सच्या पैशातून आठ किलो सोने खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्याने ज्या ज्या सराफांकडून सोनं खरेदी केलं, ते सर्व सराफ पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांचीही पोलीस कसून चौकशी करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

कोठडी वाढवून मागणार?

ललित पाटील याची उद्या कोठडी संपत आहे. त्यामुळे त्याला उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. यावेळी पोलीस त्याची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे. कारण ललितच्या ड्रग्सच्या व्यवसायाची व्याप्ती मोठी आहे. हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पोलीस त्याची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे.