नाशिक-पुणे रेल्वेसाठी जमीन मूल्यांकन निश्चित; 3 वर्षांतील सर्वोत्तम खरेदी दर मिळण्याची शक्यता!

नाशिक-पुणे रेल्वेसाठी जमीन मूल्यांकन निश्चित; 3 वर्षांतील सर्वोत्तम खरेदी दर मिळण्याची शक्यता!
प्रातिनिधिक छायाचित्र.

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 235 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग टाकण्यात येणार आहे. नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात हा मार्ग जाणार आहे. या मार्गावर एकूण 24 स्थानके असणार आहेत. या मार्गामुळे नाशिक-पुणे अंतर फक्त पावणेदोन तासांत काटले जाणार असून, ही रेल्वे प्रतितास 200 किलोमीटर वेगाने धावणार आहे.

मनोज कुलकर्णी

|

Mar 31, 2022 | 10:28 AM


नाशिकः अतिशय महत्त्वकांक्षी अशा नाशिक – पुणे (Nashik-Pune) रेल्वेसाठी (railway) चार गावांच्या जमिनींचे मूल्यांकन (valuation) निश्चित करण्यात आले असून, ते आज जाहीर केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी केल्या जाणाऱ्या भूसंपादनाला तीन वर्षांतील सर्वोत्तम खरेदी दर मिळणार असल्याचे समजते. सध्या सिन्नर तालुक्यातील गावांमधून जमीन मूल्यांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात बारगाव पिंप्री, पाटपिंप्री, वाडिवऱ्हे आणि दातली गावांमधील मूल्यांकन दराला मंजुरी मिळाल्याचे समजते. हे दर आज जाहीर केले जाणार आहेत. जमिनीचा पोत आणि प्रकारानुसार या किमती जाहीर केल्या जाणार आहेत. मात्र, अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला जमिनी देणार नसल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांना या जमिनीला भाव कमी मिळेल, अशी भीती आहे. आता आज मूल्यांकन जाहीर झाल्यानंतर इतर शेतकरी याला सकारात्मक प्रतिसाद देतात की विरोध करतात याकडे लक्ष लागले आहे.

कोठे होणार भूसंपादन?

भूसंपादनाबाबत रेल्वे विभागाने दाखल केलेल्या प्रस्तावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा मार्ग पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या चार तालुक्यां‍तून जाणार आहे. त्यासाठी 575 हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातही भूसंपादन केले जाईल. या कामासाठी जवळपास 1500 कोटींच्या निधींची गरज आहे. त्याचा पहिला टप्प्यातील 100 कोटींचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला आहे.

निधीचा अडथळाही दूर

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 235 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग टाकण्यात येणार आहे. नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात हा मार्ग जाणार आहे. या मार्गावर एकूण 24 स्थानके असणार आहेत. या मार्गामुळे नाशिक-पुणे अंतर फक्त पावणेदोन तासांत काटले जाणार असून, ही रेल्वे प्रतितास 200 किलोमीटर वेगाने धावणार आहे. नाशिकहून थेट पुण्याला फक्त पावणेदोन तासांत पोहचते करणाऱ्या या प्रकल्पासाठी निधीचा मोठा अडथळा होता. मात्र, तोही अखेर दूर झालाय. या कामासाठीच्या आपल्या हिश्शाच्या 32 कोटी निधीला यापूर्वीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. आता केंद्र सरकारच्या वित्त आयोगानेही आपल्या हिश्शाच्या 20 टक्के पैकी 19.6 टक्के निधीला मान्यता दिली आहे. त्यातही विशेष म्हणजे समभागातून 60 टक्के निधी उपलब्ध आहे.

काय आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये?

– 235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग

– रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार

– रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग

– पुढे हा वेग 250 कि. मी. पर्यंत वाढविणार

– पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापणार

– वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पूरक प्रकल्प

– पुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानकांची आखणी

– 18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग प्रस्तावित

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें