कोण मोदी, कोण फडणवीस-शिंदे- अजितदादा; नाशिकच्या अधिवेशनात राऊत महायुतीवर बरसले

| Updated on: Jan 23, 2024 | 12:26 PM

Sanjay Raut on PM Narendra Modi EM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar : नाशिकच्या सातपूर परिसरातील डेमोक्रोसी हॉलमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी महाधिवेशन होतंय. यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संबोधित केलं. त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

कोण मोदी, कोण फडणवीस-शिंदे- अजितदादा; नाशिकच्या अधिवेशनात राऊत महायुतीवर बरसले
Follow us on

योगेश बोरसे- प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नाशिक | 23 जानेवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यव्यापी महाधिवेशनात बोलताना खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर घणाघात केलाय. आधी एकच रावण होता आता अनेक रावण आहेत. महाराष्ट्रात-दिल्लीत तो रावण देखील अजिंक्य नव्हता. आजचा रावण देखील अजिंक्य नाही. हे लक्षात घ्या, प्रभूंना हे खरं वाटणार नाही.रावणाचे सैनिक हनुमानाला जेरबंद करायला गेले. त्याला कैदेत टाकले. रावणाच्या दरबारात कॉन्फिडन्स लूज करण्यासाठी हनुमान गेला होता. कोण नरेंद्र मोदी? कोण देवेंद्र फडणवीस? कोण एकनाथ शिंदे? अजित पवार कोण? कॉन्फिडन्स लूज करा, असं संजय राऊत म्हणाले.

आजच्या महाशिबिराचा सार रामकथेत- राऊत

विष्णूचे धैर्य हे कुंपणावरचे धैर्य आहे…तटस्थ धैर्य आहे. विष्णू शेषनागावर पहुडला आहे. वरती फण्याचं छत्र आहे. लक्ष्मी पाय चेपतेय आणि तिथून जगवंगे हाल अहवाल पाहताहेत. रामाचे धैर्य हे असत्याविरोधात पुकारलेलं आहे. रामाचे धैर्य हे रामराज्यात हुकूमशाहीचा पराभव व्हावा आणि लोकशाही स्थापन व्हावी. अन्याय दूर व्हावा, यासाठीचे धैर्य मी मानतो. या महाशिबिराचा सार रामकथेत आहे, असं संजय राऊत म्हणाले.

उद्धवसाहेब वेट अँड वॉच- राऊत

रामाचा काय कमी अपमान झाला. पदोपदी अपमान झाला. पण अपमान सहन केला आणि अपमान करणाऱ्यांवर कटाक्ष टाकला आणि म्हटलं वेट अँड वॉच माझी पण वेळ येईल….तसंच आपली पण वेळ येईल. उद्धवसाहेब वेट अँड वॉच… आपली पण वेळ येईल. आधी एकच रावण होता आता अनेक रावण आहेत. महाराष्ट्रात-दिल्लीत तो रावण देखील अजिंक्य नव्हता. आजचा रावण देखील अजिंक्य नाही. हे लक्षात घ्या, प्रभूंना हे खरं वाटणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

रामाचं ते शिवसेनेचं- संजय राऊत

रामाने दुसऱ्यांना मोठे केले. बिभीषण, सुग्रीव, यांना राज्य दिले. शेपूट हनुमानाचे, पण राज्य कोणाचे रावणाचे? जाळले कोणाचे राज्य रावणाचे? याला म्हणतात लीडर शिप क्वालिटी… उध्दव जी हे सर्व हनुमान इथे बसले आहेत. लंकेला आग लावायला किती वेळ लागणार आहे. रामाचे जे शौर्य आहे ते शिवसेनेचे आहे. रामाचे जे धैर्य आहे ते उध्दव ठाकरे यांचे धैर्य आहे, असं राऊत यावेळी म्हणाले.