ठाकरे गटाचं नाशिकमध्ये आज शक्तीप्रदर्शन; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राज्यव्यापी महाअधिवेशन

| Updated on: Jan 23, 2024 | 9:05 AM

Shivsena Uddhav Thackeray Group Mahaadhiveshan in Nashik : उद्धव ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. ठाकरे गटाचं राज्यव्यापी महाअधिवेशन आज होतं आहे. आज सकाळी 10 वाजता या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. वाचा सविस्तर..

ठाकरे गटाचं नाशिकमध्ये आज शक्तीप्रदर्शन; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राज्यव्यापी महाअधिवेशन
Follow us on

योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नाशिक| 23 जानेवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या नाशिकमध्ये आहेत. काल नाशिकच्या काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे तेजस ठाकरे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची आरती करण्यात आली. यावेळी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. गोदावरीतीरी विधिवत पूजा आणि महाआरती यावेळी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याचा आज दुसरा दिवस. ठाकरे गटाचं महाअधिवेशन होत आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज ठाकरे गटाचं राज्यव्यापी महाधिवेशन होणार आहे.

ठाकरे गटाचं आज महाअधिवेशन

सकाळी 10 वाजता ठाकरे गटाचं राज्यव्यापी महाअधिवेशन सुरु होईल. तर संध्याकाळी नाशिकमधल्या गोल्फ क्लब अनंत कान्हेरे मैदान इथं उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. हॉटेल डेमोक्रेसी बाहेर ठाकरे गटाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. सभास्थळी 70 बाय 40 फूट आकाराच्या मुख्य स्टेजची उभारणी करण्यात आली आहे. स्टेज समोरील भागात विशेष 2 हजार निमंत्रित व्यक्तींसाठी बसण्याची व्यवस्था असणार आहे. सभेसाठी जवळपास 70 ते 80 हजार लोक येण्याचा अंदाज आहे.

कान्हेरे मैदानाचा इतिहास

1994 साली याचा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरबाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली होती. 1994 साली ‘दार उघड, बये दार उघड’ अशी साद घालण्यात आली. याचा परिणीती म्हणून 1995 साली राज्यात युतीची सत्ता आली होती. यंदा देखील नाशिकमधील अधिवेशन आणि सभेच्या निमित्ताने याचीच पुनरावृत्ती करण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे काय रणनीती मांडणार आणि शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार, हे बघणं महत्त्वाचं आहे.

बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. याच दिवशी उद्धव ठाकरे नाशिकमध्ये सभा घेत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. तर इकडे मुंबईत बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथील स्मृती स्थळावर फुलांची सजावट करणयात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी आज अनेक शिवसैनिक स्मृती स्थळावर दाखल होण्याची शक्यता आहे.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर पोलीसही तैनात आहेत.