
महायुतीतील नाशकाचा तिढा अद्यापही कायम आहे. दरम्यान या मतदारसंघातून शिवसेनेच्या नावावर शांतीगिरी महाराजांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान त्यांनी दाखल केलेल्या अर्जानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीमधला नाशिकचा तिढा अजूनही सुटताना दिसत नाहीये. नाशिक मतदरासंघावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा दावा कायम असतानाचा शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावानं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शांतीगिरी महाराजांनी भरलेल्या उमेदवारी अर्जावर एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं आहे. तर शांतीगिरी महाराजांची भेट घेऊन गैरसमज दूर करणार असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. नाशिकचे महंत अनिकेत शास्त्रींनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा झाली असून, कागदपत्र तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचं सांगितलंय. दरम्यान त्यांचा हा दावा भाजपच्याच प्रवीण दरेकरांनी फेटाळून लावला होता.
नाशिक मतदारसंघातून लढण्यासाठी महायुतीकडून अनेक उमेदवार तयार आहेत. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे नाशकातून लढण्यासाठी इच्छूक आहेत. भुजबळांनी माघार घेतली असली तरी पक्षानं सांगितल्यास निवडणूक लढवणार असल्याचं माणिकराव कोकाटेंनी म्हटलं आहे. तर आता शांतीगिरी महाराजांनी देखील शिवसेनेच्या नावानं आपला उमेदवारी अर्ज भरलाय. नाशिकचे महंत अनिकेत शास्त्रींनी भाजपनं तयारी कराण्यास सांगितलं असल्याचं म्हटलं आहे.
एकीकडे नाशकात महायुतीचा उमेदवार ठरत नाहीये.. मात्र, दुसरीकडे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल केलाय.
शिवसेनेच्या नावानं शांतीगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नाशिकचा तिढा अजूनच वाढलाय. त्यामुळे नाशकातून कोणाच्या नावाची घोषणा होते ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
नाशिकमधून सध्या हेमंत गोडसे हे खासदार आहेत. महायुतीत नाशिकच्या जागेसाठी नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. नाशिकमधून शांतीगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. पण त्यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखले केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता ही जागा कुणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.