Raj Thackrey : त्याला हालहाल करत संपवा..! राज ठाकरे संतापले, नसरापूर घटनेवरून थेट सुनावलं…
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्याप्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे. राज ठाकरेंनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. फास्टट्रॅक कारवाईच्या सरकारच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारी आणि बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीवर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. कायद्याचा धाक उरला नसल्याचे सांगत, समाजाचे ‘लक्ष’ आणि ‘लक्ष्य’ भरकटल्याचे ते म्हणाले.

पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात अवघ्या साडेतीन-चार वर्षांच्या चिमुरड्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. 1 मे रोजी घडलेल्या या घटनेने अख्खा माहाराष्ट्र सुन्न झालाय. राज्यात संतापाची लाट उसळली असून हा अत्याचार करणाऱ्या आरोपीविरोधात तर लोक अक्षरश: पेटून उठलेत. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, न्याय करा, च्या मृत चिमुरडीला न्याय द्या अशी मागणी जनतेकडून होत असून या घटनेमुळे लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहेत. अनेक राजकारण्यांनीदेखील या घटनेबद्दल संताप व्यक्त केला असून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर भाष्य केलं आहे. “या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं.” अशी थेट मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अधिकृत अकाऊंटवरून राज ठाकरे यांनी एक लांबलचक पोस्ट लिहीत या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. फास्टटट्रॅक पद्धतीने कारवाई करू असं म्हणणाऱ्या सरकारने फास्टट्रॅकची व्याख्या पण सांगावी, असंही राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये लिहीलं आहे. महाराष्ट्रात मुली, स्त्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली आहे. कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही. राज्याचं ‘लक्ष’ विचलित झालंय आणि ‘लक्ष्य’ भरकटलंय अशा शब्दांत राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलंय.
राज ठाकरे यांची सोशल मीडियावरील पोस्ट जशीच्या तशी त्यांच्या शब्दात..
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून, त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला. या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली. या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं.
सरकार अशा घटनांमध्ये जेंव्हा फास्टटट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणतं तेंव्हा सरकारने फास्टट्रॅकची व्याख्या पण सांगावी. कारण अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते. महाराष्ट्रात मुली, स्त्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आणि असं नाहीये ते एखाद्या वर्षीच वाढत आहे, तर ते वर्षागणिक वाढत आहे, याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही. त्यात या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या गेल्याच्या बातम्या पण आल्या. ही तत्परता स्त्रियांचं, मुलींचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही ? असा सवाल राज ठाकरे यांनी या पोस्टमधून विचारला आहे.
कोडगेपणा दिसून येतो
या आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे आणि ती होईलच पण अशा घटना वारंवार का घडत आहेत ? ज्या महाराष्ट्राने देशाच्या स्त्री शिक्षणाचा, स्त्री सक्षमीकरणाचा पाया घातला त्या महाराष्ट्रात अशा घटना वारंवार का घडत आहेत याचा थोडा सर्वांगीण विचार व्हायला हवा की नको? अशी घटना घडली की जनतेच्या मनातला रोष उमटतो, सरकार मग कुठलंही असो त्यांचा कोडगेपणा दिसून येतो. दोनचार दिवसांत हे सगळं विसरलं जातं, पण यावर काहीतरी मूलभूत विचार आणि कृती करावी लागेल यावर आपण कधी बोलणार आहोत का ?
या सगळ्याकडे बघताना मला जे प्रकर्षाने जाणवतं ते म्हणजे, महाराष्ट्राचं ‘लक्ष’ आणि ‘लक्ष्य’ विचलित झालं आहे… आणि कोणाचाच कोणाला धाक उरलेला नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
तीच भीती आता नष्ट झाली आहे
‘सत्ता’ मिळवणे, ती गाजवणे याचा एक भस्मासुर जो वरपासून खालपर्यंत धुमाकूळ घालायला लागला आहे त्याने महाराष्ट्र पूर्ण विस्कटायला लागला आहे. प्रत्येकाला या ना त्या मार्गाने सत्ता मिळवायची आहे आणि गाजवायची आहे. राजकारण्यांना, काही उद्योगपतींना सत्ता हवी आहे. हल्ली लेखकांना पण साहित्य संमेलनाच्या मार्फत सत्ता गाजवायचा मोह होतो. अगदी एशियाटिक सारख्या संस्थेत सुद्धा सत्तेची लढाई पेटते, आणि एकूणच सत्तेच्यासाठी वाट्टेल ते याचं असं काही उदात्तीकरण होत आहे की हाच पुरुषार्थ वाटतो. जे वरती घडतं त्याचं प्रतिबिंब खाली उमटत असतं. अगदी दुबळा माणूस सुद्धा या सगळ्यात सैरभैर होऊन आपल्यापेक्षा दुबळ्यांच शोषण करतो.
याकडे पूर्वी मोठ्यांचं लक्ष असायचं, कोणीतरी कोणाचे तरी कान उपटायचे. राजकारण्यांना पत्रकारांचा धाक होता, समाजात प्रत्येकाकडे कोणाचं तरी कोणाकडे लक्ष असायचं तेच हललं आहे.
पूर्वी आपल्याकडे कोणीतरी बघतंय, उद्या काही केलं तर आपली, आपल्या घरच्यांची समाजात छीथू होईल ही भीती असायची तीच आता नष्ट झाली आहे . हे गंभीर आहे. समाजात चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रवृत्ती असतात. त्यातल्या वाईट प्रवृत्तींवर समाजाची, कायद्याची जी दहशत, नियंत्रण असायला हवं तेच नाहीस झालेल दिसतंय, असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहीलं आहे.
हाताबाहेर गेलेली लालसा +सत्ता गाजवण्याची हाव + ओटीटी वरचा कन्टेन्ट + पैशाच्या आणि जमिनीच्या मागे फरफटत जाणे आणि मोबाईल मधे सतत गुंतून राहणे याने सगळी घडी विस्कटली आहे.
तर मात्र आपला वाली कोणीच नाही
या आणि अशा घटनांनी महाराष्ट्र अधिक जखमी होत आहे याचं भान माध्यमं, राजकारणी आणि समाजांनी ठेवलं पाहिजे . मी नेहमी माझ्या भाषणांत सांगतो की १९९५ नंतर महाराष्ट्र आरपार बदलला. १९९२ पासून जगाचे दरवाजे आपल्यासाठी उघडले गेले . उदारीकरणाचे वारे देशभर घुमू लागले , परंतु हे वारे आपण निट समजूनच घेतले नाहीत . उदारीकरणाने प्रचंड फायदे झाले पण जिथे आम्हाला लोकशाहीच समजली नाही तीथे उदारीकरण काय समजणार ? उदारीकरणाने सगळी जुनी मूल्यव्यवस्था उध्वस्त केली आणि नवी व्यवस्था इतकी व्यक्तिकेंद्रित आणि लालसाकेंद्रित केली की जर आपण आजच यावर सर्वांगाने विचार केला नाही तर मात्र आपला वाली कोणीच नाही हे नक्की.
मी माझा पक्ष याच समाजाचा घटक आहोत. ज्या ज्या गोष्टी मी सुचवल्यात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी आणि माझा पक्ष सर्वतोपरी पुढे असू हे नक्की. अशा घटना परत कधीच घडू नयेत आणि महाराष्ट्राचं विचलित झालेलं ‘लक्ष’ आणि भरकटलेलं ‘लक्ष्य’ पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकारने तातडीने करावं ! अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
राज ठाकरे |