महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील मृतांचा आकडा 11 वर, मृतांची यादीत महिलांची संख्या अधिक; यादी जाहीर

| Updated on: Apr 17, 2023 | 7:16 AM

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान उष्माघातामुळे 11 श्री सेवकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील मृतांचा आकडा 11 वर, मृतांची यादीत महिलांची संख्या अधिक; यादी जाहीर
heatstroke
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

खारघर : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 11 वर गेला आहे. तर अजूनही अनेकजण अत्यस्वस्थ आहेत. नवी मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात या श्रीसेवकांवर उपचार सुरू आहेत. कडक उन्हात दोन तास बसल्यामुळे मळमळ, उलट्या आणि जुलाब सुरू झाल्याने या श्रीसेवकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यातील 11 जण दगावले. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे.

हे सुद्धा वाचा

उष्माघाताचा तडाखा बसलेल्यांवर नवी मुंबई, कळंबोली, कामोठे, परिसरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 8 जणांना उपचार करून डिशचार्ज देण्यात आला आहे. कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन उपचार घेणाऱ्या श्री सदस्यांची विचारपूस केली. मुख्यमंत्री यांनी मयतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखाची मदत सुद्धा जाहीर केली आहे. पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम हा सकाळी 10 ते दुपारी 3 या कालावधीत भर उन्हात झाला. या कार्यक्रमात अनेक त्रुटी असल्यामुळे आणि उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे उष्मघाताने या कार्यक्रमात लोकांचा जीव गेला असल्याचे आरोप होत आहे.

मुनगंटीवारांनी जबाबदारी ढकलली

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमाची वेळ ही स्वत: धर्माधिकारी यांनी दिली होती असे सांगून आपली जबाबदारी झटकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ज्या 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यातील रात्री उशिरा पर्यंत 10 जणांची ओळख पटली आहे. एका महिलेची अद्याप ओळख पटली नसून तिची ओळख पाठविण्याचे काम प्रशासन करीत आहे. हे सर्व मृतदेह पनवेलच्या नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून, काही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत. काही मृतदेह रुग्णालयातच आहेत.

 

कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती मृतदेह?

एमजीएम हॉस्पिटलमध्ये 01

भारती मेडिकल हॉस्पिटलमध्ये 02

टाटा हॉस्पिटलमध्ये 08 असे

एकूण 11

मृतांची नावे

01. तुळशीराम भाऊ वागडे वय 58, जांभूळ विहीर ता. जव्हार

02. जयश्री जगन्नाथ पाटील वय 54, रा. वारळ पो. मोदडी ता. म्हसळा

03. महेश नारायण गायकर वय 42, रा. मेदडू ता. म्हसळा

04. मंजुषा कृष्णा भोगडे, रा. भुलेश्वर मुंबई

05. भीमा कृष्णा साळवे, वय 58, रा. कळवा ठाणे

06. सविता संजय पवार, वय 42, रा. मंगळवेढा, सोलापूर

07. स्वप्नील सदाशिव किणी, वय 32, रा. विरार

08. पुष्पां मदन गायकर, वय 63. कळवा, ठाणे

09. वंदना जगन्नाथ पाटील, वय 62, रा. माडप. ता. खालापूर

10. कलावती सिद्धराम वायचल, रा. सोलापूर

11 अनोळखी आहे

पाच लाखाचे अर्थसहाय्य जाहीर

या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. आज खारघर येथे आयोजित डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात उष्माघातामुळे काही श्री सदस्यांना रुग्णालयात हलवावे लागले, दुर्दैवाने त्यातील 11 जणांचे उपचार सुरू असताना निधन झाले. ही अतिशय अनपेक्षितपणे घडलेली दुर्देवी आणि वेदनादायी घटना आहे.

या घटनेची माहिती कळताच मी स्वतः कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात तातडीने धाव घेतली. डॉक्टरांशी तसेच उपचार सुरू असणाऱ्या श्री सदस्यांशी बोललो आहे. या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या श्री सदस्यांच्या परिवारास प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात येतील आणि उपचार घेत असणाऱ्या श्री सदस्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनातर्फे केला जाईल असे निर्देश प्रशासनाला आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

रुग्णालयात दाखल काही श्री सदस्यांच्या उपचारांवर मी स्वतः लक्ष ठेवून असून प्रशासन आणि डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. उपचार घेणाऱ्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.