राज्यातील ओबीसीच नव्हे, इतर समाजातील नेत्यांची तातडीची बैठक; छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर मोठ्या राजकीय घडामोडी?

मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाला यश आल्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या निर्णायनंतर ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी तर आजचे सर्व दौरे रद्द केले आहेत. तसेच उद्या त्यांनी मुंबईत त्यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत भुजबळ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यातील ओबीसीच नव्हे, इतर समाजातील नेत्यांची तातडीची बैठक; छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर मोठ्या राजकीय घडामोडी?
chhagan bhujbal
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 27, 2024 | 1:33 PM

अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी मुंबई | 27 जानेवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांची एक मोठी मागणी अखेर सरकारने मान्य केली आहे. सग्यासोयऱ्यांनाही आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने सग्यासोयऱ्यांची व्याख्याही केली आहे. अखेर मोठी मागणी सरकारने मंजूर केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनीही आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. मात्र, या निर्णयानंतर ओबीसी समाजात खळबळ उडाली आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांनी उद्या त्यांच्या निवासस्थानी सर्व ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला त्यांनी इतर समाजाच्या नेत्यांनाही बोलावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

ओबीसी समाजाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शासकीय बंगल्यावर उद्या संध्याकाळी ओबीसी समाजातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यांनी या बैठकीला राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांना पाचारण केलं आहे. तसेच एससी, एसटी आणि एनटी समाजातील नेते आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही बैठकीला बोलावलं आहे. छगन भुजबळ यांनी ही तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भुजबळ उद्या काय निर्णय घेतात? भुजबळांच्या बंगल्यावर काय राजकीय खिचडी शिजते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भुजबळ उद्याच भूमिका मांडणार

छगन भुजबळ या बैठकीमध्ये मराठा समजाला दिलेल्या सरकारच्या अध्यादेशावर जहरी अशी भूमिका मांडणार आहेत. त्याचसोबत या सरकारच्या निर्णयामुळे इतर समाजाच्या आरक्षणावर कशा पद्धतीने परिमाण होणार आहे यासंदर्भात या बैठकीत छगन भुजबळ भाष्य करणार आहेत. त्यामुळे भुजबळ यांच्या या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच इतर समाजातील नेते भुजबळांना साथ देतात का? या बैठकीतून नव्या आंदोलनाची हाक दिली जाणार का? आदी प्रश्नांची उत्तरे उद्याच मिळणार आहेत.

सर्व दौरे रद्द

दरम्यान, सरकारने काढलेल्या जीआरनंतर छगन भुजबळ यांनी आपले नाशिकमधील सर्व कार्यक्रम केले रद्द आहेत. भुजबळ आज राज्य नागरी सहकारी बँक परिषद आणि एका कृषी प्रदर्शन कार्यक्रमाला राहणार होते. मात्र आता भुजबळ या बैठकीला जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे. मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच उद्या याच मुद्यावर भुजबळ यांनी मुंबईत तातडीची बैठकीही बोलावली आहे.