पनवेल नवी मुंबईत महिला पुरोहित करणार गणपतीची प्राणप्रतिष्ठापना

| Updated on: Sep 06, 2021 | 3:51 PM

महिलाही मोठ्या संख्येने या क्षेत्रात उतरल्या आहेत. आजचा जमाना स्त्री-पुरुष समानतेचा आहे. जीवनातले कोणतेही क्षेत्र असे नाही की ज्या क्षेत्रात महिला वर्गाने आपली छाप सोडली नाही. महिला पुरोहितांना पूजा अर्चनासाठी आता चांगली मागणी आहे.

पनवेल नवी मुंबईत महिला पुरोहित करणार गणपतीची प्राणप्रतिष्ठापना
पनवेल नवी मुंबईत महिला पुरोहित करणार गणपतीची प्राणप्रतिष्ठापना
Follow us on

नवी मुंबई : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रत्येक घराघरात बाप्पा येणार म्हणून साफसफाईची रेलचेल सुरू आहे, खरेदी साठी ग्राहक येणार म्हणून बाजारपेठा सुद्धा सजल्या आहेत. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव कमी असले तरी घरोघरी गणपती बसवणाऱ्यांची संख्या मात्र दुपटीने वाढणार यात शंका नाही. बाप्पा घरी येणार म्हणून प्रत्येक जण आपली प्लॅनिंग करतोय, मग ते डेकोरेशन असो किंवा पूजेचं साहित्य. आणि हो भटजी ( पुरोहित ) हवेच ना ! गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाची प्रतिष्ठापना करणारी पूजा महत्त्वाची मानली जाते. गणेशोत्सवाच्या काळात पुरोहितांचा दिवस पहाटे दोन वाजता उगवतो. पहाटे तीन वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत या पूजा चालतात. एका पुरोहिताच्या 10 ते 12 शास्त्रोक्त पूजा सांगून होतात. पौरोहित्य ही पुरुषांची मक्तेदारी आहे. हा समज आता महिलांनी मोडून काढलेला आहे. (Ganpati will be inaugurated by a woman priest in Panvel Navi Mumbai)

पौराहित्यामध्येही महिलांची छाप

नवी मुंबई, पनवेलमध्ये महिलासुद्धा पुरोहित आहेत. जे गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा असेल किंवा सत्य नारायणाची पूजा हे सारे काही करतात. पनवेल, नवी मुंबईत शेकडो महिला पुरोहित सक्रिय झाल्या आहेत. महिलाही मोठ्या संख्येने या क्षेत्रात उतरल्या आहेत. आजचा जमाना स्त्री-पुरुष समानतेचा आहे. जीवनातले कोणतेही क्षेत्र असे नाही की ज्या क्षेत्रात महिला वर्गाने आपली छाप सोडली नाही. महिला पुरोहितांना पूजा अर्चनासाठी आता चांगली मागणी आहे. महिला पुरोहित शांतपणे कुठलीही घाई न करता पूजा करतात. विशेष म्हणजे एवढीच दक्षिणा हवी किंवा तेवढीच दक्षिणा हवी त्यांना द्याल तेवढी दक्षिणा मान्य असते. गेल्या काही वर्षात शेकडो महिला पौरोहित्य शिकून तयार झाल्या आहेत. त्यांना तयार करण्यासाठी काही महिला पुरोहित मंडळ सुद्धा आहेत.

पूजापाठ, वेदमंत्रपठण लघुरुद्र, गणेशयाग, नक्षत्रशांती, दुर्गासप्तशक्ती पाठवाचने, वास्तूशांती, गणेशपूजन, सत्यनारायण पूजा, लग्न, मुंज, साखरपुडा, नवचंडी याग, उदकशांती, एकसष्टी, सहस्रचंद्रदर्शन विधी, आदि अनेक धार्मिक कार्यासाठी त्यांना मागणी असते. महिला पुरोहिता ही आता नवीन वा आश्चर्याची गोष्ट राहिलेली नाही. पण घरातील स्वयंपाक, सणासुदीची तयारी पाहुण्यांचं आगत स्वागत अशा अनेक गोष्टी त्यांना कराव्या लागत असल्याने त्यांच्या पूजाअर्चा सांगण्यावर स्वाभाविकपणेच मर्यादा पडतात. मात्र खणखणीत आवाज, शुद्ध आणि स्पष्ट शब्दोच्चार उत्तम पाठांतर, पूजापाठाचा अर्थ त्याचा विधीशी संबंध, पूजापाठ व पूजासामग्रीमधले विज्ञान या सर्व गोष्टी महिला पुरोहित यजमानांना समजावून सांगत असल्याने त्यांचे पौरोहित आता लोकमान्य व लोकप्रिय झालेले आहे.

बरं फक्त गणेश उत्सव काळातच नाही तर महिला पुरोहित आता बाराही महिने आपल्या कामासाठी तयार असतात. महिला पुरोहितांचा कुठेही पूजा सांगण्यास जाण्यासाठी तत्पर असतात. मात्र जर पूजेचे ठिकाण शहरात दूर असेल तर त्यांना ने-आण करण्याची व्यवस्था करावी लागते. शहरातच नाही तर शहराबाहेर सुद्धा त्या पूजा करण्यासाठी बाहेर पडत आहेत पनवेल, नवी मुंबई बरोबरच ठाणे, डोंबिवली, कल्याण, गिरगाव, पार्ले, माहिम, पुणे, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी त्या पूजापाठ व यज्ञासाठी जात आहेत.

कोलकात्यामध्येही यंदाची दुर्गा महिला पुजारी करणार

कोलकातामध्येही यावर्षी दुर्गा पूजेमध्ये ऐतिहासिक बदल घडलेला पाहायला मिळत आहे. बंगालची दुर्गा पूजा जगप्रसिद्ध आहे. ऐतिहासिक पाऊल टाकत कोलकाताच्या 66 पल्ली दुर्गा पूजा समितीने ठरवले आहे की या वर्षी क्लबची दुर्गा पूजा पुरुष पुजाऱ्यांऐवजी 4 महिला पुजारी करणार आहेत. गेल्या वर्षाच्या अखेरीस पूजा समितीच्या एका वृद्ध पुरुष पुजाऱ्याच्या मृत्यूनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर तामिळनाडूमध्ये महिला पुजारी बनवण्यावरून बराच काळ वाद झाला होता. 2008 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने एका आदेशात एका महिला पुजाऱ्याला तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मंदिरात पूजा करण्याची परवानगी दिली. तामिळनाडूच्या मंदिरांमध्ये महिलांना पुजारी बनू शकतील असा निर्णय देण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागतही केले पाहिजे कारण यामुळे केवळ पुरुष पुजाऱ्यांना पूजा-पाठ करण्याचा अधिकार आहे या शतकानुशतके जुन्या रूढीवादी परंपरा मोडीत काढल्या जात नाहीत, तर समाजात अधिक चांगले बदल घडवून आणण्याची ही सुरुवात आहे. (Ganpati will be inaugurated by a woman priest in Panvel Navi Mumbai)

इतर बातम्या

पुण्यात 13 वर्षीय मुलीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार, 8 जणांना बेड्या, महाराष्ट्राला हादरवणारी घटना

कोकणात जाणाऱ्या मार्गावर पोलीस तैनात; वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दिलीप वळसे-पाटलांच्या सूचना