Amit Thackeray: नेरुळमध्ये अमित ठाकरेंचे शक्तीप्रदर्शन, पोलीस ठाण्यासमोर मनसैनिकांची तोबा गर्दी, या घडीची मोठी घाडमोड काय?

Amit Thackeray MNS: गेल्या आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यावरून मोठा वाद उफाळला होता. पोलिसांनी मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांना नोटीस बजावली होती. याप्रकरणी आज नेरुळमध्ये अमित ठाकरे दाखल झाले आहेत.

Amit Thackeray: नेरुळमध्ये अमित ठाकरेंचे शक्तीप्रदर्शन, पोलीस ठाण्यासमोर मनसैनिकांची तोबा गर्दी, या घडीची मोठी घाडमोड काय?
अमित ठाकरे, मनसे,
Updated on: Nov 23, 2025 | 1:51 PM

Amit Thackeray MNS Nerul: “हे यश महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांचं आहे. त्यांच्या ताकदीमुळे आपण हे कार्य करू शकलो. राजकारणात यायच्या अगोदरपासून मी राज ठाकरे यांना बघत आलो. त्यांनी महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी अनेक केसेस झेलल्या. मराठी हक्कासाठी, मराठी माणसासाठी मनसैनिक लढत आहेत. त्यामुळे ही पहिली केस अंगावर घेण्याचा आत्मविश्वास या सर्वांमुळे मला मिळाला आहे. त्यामुळे तुमचे सर्वात अगोदर धन्यवाद मानतो. गेल्या रविवारपासून ही गोष्ट सुरू आहे. या आठवड्यात मी इतकंच शिकलोय की समोरच्याने आपल्याला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी महाराजांचे आणि देवांचे आशीर्वाद असले की समोरचे झुकतात.” असा छोटेखानी पण जबरदस्त संदेश अमित ठाकरे यांनी नेरुळमधील सभेतून दिला.

गेल्या आठवड्यात अमित ठाकरे हे नेरुळमध्ये असताना त्यांना येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण रखडल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने तिथे जात या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर नेरुळ पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. ही नोटीस घेण्यासाठी ते घरी नव्हते. त्यानंतर ही नोटीस स्वीकारण्यासाठी आपण स्वतः पोलीस स्टेशनला जाण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार आज ते नेरुळमध्ये दाखल झाले. ते स्वतः ठाण्यात जाऊन नोटीस स्वीकारणार आहेत.

वातावरण निर्मिती करण्यात मोठे यश

गेल्या रविवारी अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यावेळी त्यांनी महाराजांच्या पुतळ्यावरील कपडा सुद्धा खराब झाल्याचा आरोप केला आणि पुतळ्याचे अनावरण केल्याचे जाहीर केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली. ती स्वीकारण्यासाठी ते आज नेरुळ येथे दाखल झाले. सकाळपासून त्यांचा ताफा, ते नेरुळमध्ये येऊन काय बोलणार याची उत्सुक्ता मनसैनिकांमध्ये होती. मनसैनिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. अमित ठाकरे यांनी आल्यानंतर छत्रपती शिवरायांना अभिवादन केले आणि नंतर त्यांनी मनसैनिकांशी हितगूज साधले.

महाराजांचे गड किल्ले स्वच्छ करणार

माझ्या भाग्यात अजून एक गोष्ट लिहिली आहे. महाराजांचे गड किल्ल्यांचे संवर्धन आणि सुशोभिकरण करून ते जगासमोर आणणार असल्याची मोठी घोषणा अमित ठाकरे यांनी यावेळी केली. जगाने दखल घेतली पाहिजे, महाराजांचे गडे किल्ले जगासमोर आणायचे आहेत असे ते म्हणाले. त्यामुळे ते गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेणार असे समोर आले आहे.