
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत. या विमानतळामुळे या परिसरात बरचं काही बदलणार आहे. रिअल इस्टेट म्हणजे गृह बांधणी क्षेत्राला आसपासच्या भागात चालना मिळाली आहे. विमानतळामुळे व्यावसायिक आणि रहिवाशी भागात मोठा बदल, विकास होईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मागच्या काही वर्षांपासून या भागात जमिनींचे भाव वाढले आहेत. विमानतळ परिसराच्या आसपास 2 BHK ते 3 BHK घरं 1 कोटी रुपयांच्या आत विकत घेता येऊ शकतात, असं रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांच म्हणणं आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उलवे येथे आहे. हा विमानतळ म्हणजे भारतातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रोजेक्ट आहे. यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील भार कमी होईल अशी अपेक्षा आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो विस्तार यामुळे नवी मुंबईपर्यंत प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. मूळ मुंबईच्या जवळ असल्याने या भागात रिअल इस्टेटच्या किंमती आणखी वाढू शकतात. 1 कोटी किंवा त्याच्या आत ज्याचं घर खरेदीच बजेट आहे, त्यांच्यासाठी इथे चांगले पर्याय आहेत, असं रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विकासकांच म्हणणं आहे.
उलवे, तळोजा येथे घराच्या किंमती किती?
विमानतळापासून उलवे 10 ते 15 मिनिटांवर आहे. इथे 1 BHK आणि 2 BHK ची प्राइस 40 लाख ते 80 लाख दरम्यान आहे. मेट्रो लाइनचा तळोजाला फायदा होईल अशी अपेक्षा आहे. इथे 1 BHK 45 लाख आणि 2 BHK चे दर 90 लाखाच्या घरात आहेत. खारघरमध्ये बराच विकास झालाय. तिथे 1 BHK ची किंमत थोडी जास्त आहे. नवी मुंबईत शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल यांचं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे.
किती कोटी प्रवासी हाताळण्याती क्षमता असेल?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. हा टप्पा सुमारे 19,650 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर वर्षाला 9 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता असेल.