रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांनी कारवाई नेमकी कशी केली?

| Updated on: Apr 24, 2021 | 11:19 PM

रेमेडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या काँग्रेस वाहतूक सेलचा पदाधिकारी हरपिंदर सिंग यास न्यायालयाने 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे (Navi Mumbai police caught Congress leader who black marketing Remdesivir injection)

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांनी कारवाई नेमकी कशी केली?
रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
Follow us on

नवी मुंबई : रेमेडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या काँग्रेस वाहतूक सेलचा पदाधिकारी हरपिंदर सिंग यास न्यायालयाने 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी हरपिंदर सिंगला रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. हरपिंदर सिंगच्या अटकेमुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजारा करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे (Navi Mumbai police caught Congress leader who black marketing Remdesivir injection).

रेमडेसिवीर इंजेक्शनचा बाजारात तुटवडा

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन काही समाजकंटकांकडून रेमडेसिवीर इंजेक्शन दुप्पट, तिप्पट दरात बाजारात विक्री केली जात आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी जीवनदान ठरत असल्यामुळे त्याची प्रचंड प्रमाणात मागणी आहे. त्याचाच फायदा घेऊन काही समाजकंटक चढ्या दराने इंजेक्शनची विक्री करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून धडक कारवाई देखील सुरु आहे. अशाच एका कारवाईत पोलिसांनी खारघरमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला रेमडेसिवीरचा काळाबाजार करताना रंगेहाथ पकडले (Navi Mumbai police caught Congress leader who black marketing Remdesivir injection).

पोलिसांनी आरोपीस कसे पकडले?

आरोपी रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीसाठी खारघरमधील लिट्ल वर्ल्ड मॉल समोरील रस्त्यावर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेतील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. या जाळ्यात आरोपी अचूकपणे अडकला. दोन रेमडेसीवीर इंजेक्शन घेवून आलेल्या हरपिंदर सिंग (वय 41, रा. कळंबोली) यास अटक केली. त्याच्याकडून जवळपास 5 लाख 18 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

इंजेक्शनच्या काळाबाजारात कोणकोण सामील?

हरपिंदर सिंगला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याला 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काँग्रेस वाहतूक सेलचा पदाधिकारी हरपिंदर सिंग याच्या समवेत आजून कोण या रेमडेसिवीरच्या काळाबाजार करण्यात सहभागी आहे, तसेच रेमडेसिवीर त्यांनी कुठून आणले, याबाबत गुन्हे शाखा कसून तपास करीत आहे.

काँग्रेसची भूमिका काय?

विशेष म्हणजे महाआघाडीतील बड्या नेत्यांसोबत आरोपीचे फोटो सोशल मिडीयावर आहेत. त्यामुळे बारामतीप्रमाणेच पनवेल परिसरातील या प्रकाराने चर्चेला उधाण आले आहे. मात्र काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी हरपिंदर सिंगने स्वतः महिन्याभराआधी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्ष म्हणून आम्ही काय कारवाई करणार? जे घडलं ते अतिशय वाईट कृत्य आहे. मी याचा निषेध करतो, अशी भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा : हायवेच्या कडेला पीपीई किटमध्ये मृतदेह, महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?