उद्धव ठाकरे यांच्यावर पक्ष फुटीची महासंक्रात, 14 तारखेनंतर काय घडणार?; बड्या मंत्र्यांचं मोठं विधान

| Updated on: Jan 13, 2024 | 11:49 AM

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल आल्यानंतर ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. पक्ष चिन्ह आणि पक्षाच्या नावाशिवाय निवडणुकांना कसं सामोरे जायचं? असा सवाल ठाकरे गटाच्या आमदार आणि खासदारांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाकरे गटात अस्वस्थता असल्याचं सांगितलं जात आहे. ही चर्चा असतानाच शिंदे गटाच्या एका बड्या नेत्याने ठाकरे गटावर संक्रात कोसळणार असल्याचं सांगत खळबळ उडवून दिली आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर पक्ष फुटीची महासंक्रात, 14 तारखेनंतर काय घडणार?; बड्या मंत्र्यांचं मोठं विधान
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

रत्नागिरी | 13 जानेवारी 2023 : शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय आला आहे. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत. मात्र, निवडणूक चिन्ह आणि पक्षाचा ताबा शिंदे गटाकडे दिला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे. मात्र, कोर्टात हा खटला चालेपर्यंत विधानसभेच्या निवडणुका होऊन जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाला पक्ष आणि पक्ष चिन्हाशिवायच निवडणुकीला सामोरे जावं लागणार असल्याने ठाकरे गटाच्या आमदार, खासदार आणि नगरसेवकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात ठाकरे गटावर फुटीचं महासंकट उभं राहिलं आहे. शिंदे गटाच्या बड्या नेत्याने तर 14 तारखेनंतर बडा धमाका होणार असल्याचे संकेतच दिले आहेत. क

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रता प्रकरणावर निकाल दिल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मीडियाशी संवाद साधला. हा निकाल लागल्यानंतर काय घडू शकणार आहे ही आतली बातमीच उदय सामंत यांनी सांगितली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क लढवले जात आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आमच्याकडे येणार आहेत. 14 तारखेपासून काय होतंय ते पहा, असं थेट विधानच उदय सामंत यांनी केलं आहे. त्यामुळे कोणते आमदार शिंदे गटात येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच उद्यापासून राज्यात काय काय घडणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मिलिंद देवरा आले तर…

उदय सामंत यांनी यावेळी काँग्रेस मिलिंद देवरा यांच्या काँग्रेस सोडण्याबाबतच्या चर्चांवरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मिलिंद देवरा यांच्या सारख्या नेत्याची एकनाथ शिंदे यांना साथ मिळाली तर मुंबईत शिवसेना भक्कम होईल. त्यांच्या मनात पक्षात येण्याची इच्छा असेल तर शिंदे यांचे नेतृत्व स्विकारून बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. सहकारी म्हणून देवरा यांचा चेहरा मिळाला तर शिवसेनेची ताकद फार मोठ्या ताकदीने वाढेल. मिलिंद देवरा हे लोकांमध्ये जावून काम करणारे नेतृत्व आहे. त्यांच्याकडे मुरली देवरा साहेबांचा वारसा आहे. अनेक माजी आमदार त्यांच्यासोबत काम करतात, असे गौरवोद्गारही सामंत यांनी काढले.

ते सैरभैर, त्यांच्याकडे चेहरा नाही

महाविकास आघाडीवरही त्यांनी चर्चा केली. ज्या महाविकास आघाडीला पंतप्रधानपदाचा चेहरा नाही त्यांचा आम्ही विचार करत नाही. आधी त्यांनी पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करावा, मोदींच्या विरोधात 10 ते 20 टक्के मतदान घेणारा चेहरा त्यांनी जाहीर करावा. हे सैरभैर झालेत कारण यांच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नाही, अशी टीका त्यांनी केली.

विजयाची हॅट्रीक होईल

उद्धव ठाकरे यांचा आज कल्याणचा दौरा आहे. यावरही त्यांनी भाष्य केलं. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात कोणी गेलं तरी काही धोका नाही. कुणाला कितीवेळेस जायचं त्यांनी जावं. श्रीकांत शिंदे हे विजयाची हॅट्रीक केल्याशिवाय राहणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.