
नवी मुंबईत गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार बॅटिंग केली. पावसाचे पाणी शिरल्याने येथे भाजीपाला आणि फळांची आवक घटली आहे. तर आहे तो भाजीपाला आणि फळं भिजल्याने तो लवकर खराब होण्याची भीती व्यापार्यांमध्ये आहे. आता भाज्यांची आवक घटल्याने आणि नाशवंत माल असल्याने भाजीपाल्याचे दर कडाडण्याची भीती आहे. सध्या भाजीपाल्याच्या दरात सरासरी 30 ते 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसात भाजीपाला महागण्याची शक्यता आहे.
भाजीपाला-फळे फेकून देण्याची वेळ
सोमवारी आणि मंगळवारी पहाटे भाज्या आणि फळांची एपीएमसीमध्ये पोहचली. नेहमीपेक्षा हा आवक घटली. जो माल आला तोही पावसात भिजल्याने भाज्यासह फुटलेली फळ फेकून देण्याची वेळ आली. दुसरीकडे राज्यातील अनेक भागांना पावसाने झोडपले. नदी-नाले खवळले. रस्ते जलमय झाले. त्यामुळे मुंबईला भाज्या आणि फळांच्या पुरवठ्याला फटका बसला. भाजी एकतर कमी प्रमाणात आली. त्यातही खराब माल निघाल्याने व्यापारी चिंतेत सापडला. आता ग्राहकांच्या खिशावर या सर्व घडामोडींचा ताण येणार आहे. भाजीपाल्याच्या किंमती 30-35 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले.
ग्राहक नाराज
रविवारी बाजाराला सुट्टी असते. तर सोमवारी पावसामुळे अनेक जण बाजाराकडे फिरकले नाही. मंगळवारी ग्राहक बाजारात आले. तेव्हा चांगला माल नसल्याने अनेकांची निराशा झाली. त्यातच जो माल आहे, त्याची पण किंमत अधिक असल्याने ग्राहकांना जादा दाम मोजावे लागले. ताज्या दरानुसार, टोमॅटो आता 20 रुपयांवहून किलोमागे 40 रुपयांच्या घरात तर कोबीचा भाव 10 रुपयांहून 30 ते 40 रुपयांच्या घरात पोहचल्याचे समोर आले.
कांद्याचे मोठे नुकसान
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सततच्या पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे काढून ठेवलेला शेतातील अनेक शेतकऱ्यांचा कांदा भिजल्यामुळे या कांद्याला व्यापारी खरेदी करत नसल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याने नाशिकच्या निफाड तालुक्यात चारा पाण्याच्या शोधात असलेल्या मेंढ्यांपुढे कांदा ओतून देत आपला संताप व्यक्त केला या कांद्यावर मेंढ्यांनी ताव मारला.